सलग 11व्यांदा आरबीआयच्या पतधोरणात बदल नाही
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
गेल्या दहा पतधोरण समिती बैठकांमध्ये रिझर्व्ह बँकेनं घेतलेली भूमिका आता 11व्या समिती बैठकीतही कायम ठेवली आहे. अर्थात, सलग अकराव्यांदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पतधोरण 6.5 टक्के म्हणजेच जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली. देशात महागाईचे वाढलेले दर आणि आर्थिक विकास दरामध्ये दिसणारी घट या पार्श्वभूमीवर आरबीआयनं व्याजदर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे बाजारात चर्चेला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, एकीकडे आरबीआयने व्याजदर जैसे थे ठेवले, असताना दुसरीकडे देशाचा अंदाजित विकासदरदेखील खाली आणला आहे. याआधी 7.2 टक्के दराने आर्थिक विकास साध्य होईल, असा अंदाज रिझर्व्ह बँकेनं वर्तवला होता. पण आता तो कमी करून 6.6 टक्के असा ठेवण्यात आला आहे. यावर्षी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर गेल्या सात तिमाहींमध्ये सर्वात कमी म्हणजेच 5.4 टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याचं पाहायला मिळालं होतं.
याशिवाय रिझर्व्ह बँकेनं कॅश रिझर्व्ह रेश्यो अर्थात सीआरआरदेखील 4.5 टक्क्यांवरून 4 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय, बँकांना 1.16 कोटींची गंगाजळी उपलब्ध करून दिली जाईल, असंही गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नमूद केलं. सीआरआर म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून महागाई दर आटोक्यात आणण्यासाठी राखून ठेवण्यात येणारा प्रत्यक्ष निधी. त्यामुळे हा निधी रिझर्व्ह बँकेकडे कमी होणार असून, बाजारात जास्त प्रमाणात बँकांना उपलब्ध होणार आहे.