| महाड | प्रतिनिधी |
महाडजवळील कोल गावातील प्राचीन बौद्धकालीन लेणी परिसरामध्ये यावर्षीचा आंतरराष्ट्रीय पर्वत दिन उत्साहात साजरा करण्यात आला. युनेस्कोच्या अन्न व कृषी विभागातर्फे गेल्या वीस वर्षांपासून जगभरात हा दिन पर्वत संवर्धन, त्याचे मानवजातीशी असलेले नाते आणि जागरूकतेसाठी साजरा केला जातो. यंदाचा जागतिक पर्वत दिन ‘जगाला शुद्ध पाणी, ऊर्जा आणि अन्न पुरवणाऱ्या हिमनद्यांचे संवर्धन’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित होता. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या उपक्रमांतर्गत, महाड येथील सह्याद्री मित्र गिरीभ्रमण संस्था यांच्या वतीने कोल लेण्यांमध्ये पर्वत पूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात रा.जि.प. शाळा कोल आणि रायगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिरगाव शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी सह्याद्री मित्राचे गिर्यारोहक व इतिहास अभ्यासक संकेत शिंदे यांनी लेण्यांचा इतिहास, शिलालेखांचे वाचन, तसेच प्राचीन महाड बंदरातून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापाराविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तर सरपंच किशोर लोखंडे यांनी या प्राचीन लेण्यांची दुरावस्था अधोरेखित करत पुरातत्त्व विभागाने याचे संवर्धन करण्याची गरज व्यक्त केली.







