कर्जत तालुक्यात आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन भव्य रॅलीने साजरा

नेरळ | वार्ताहर |
आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजाने रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला. नेरळ येथील हुतात्मा चौकातून निघालेली आदिवासी रॅली कशेळे येथे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून संपन्न झाली.

कर्जत तालुका आदिवासी समाज संघटना आणि आदिवासी सेवा संघाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा करण्यात आला. कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजाच्या अनेक संघटना असून, आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त सर्व आदिवासी यांनी एकत्र येत आदिवासी दिन साजरा केला. आदिवासी दिन तसेच ऑगस्ट क्रांती दिन लक्षात घेऊन आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात नेरळ येथील माथेरान नाक्यावर असलेल्या हुतात्मा चौकातून झाली. देशासाठी आपले प्राण गमवावे लागलेल्या हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या अर्धपुतळ्यांना बुधाजी हिंदोळा, जैतु पारधी, सुनील पारधी, गणेश पारधी यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.

आदिवासी रॅलीची सुरुवात ज्येेष्ठ कार्यकर्त्या आणि रायगड जिल्हा परिषद सदस्या अनसूया पादिर आणि कर्जत पंचायत समितीच्या उपसभापती जयवंती हिंदोळा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाली. आदिवासी रॅलीचे स्वागत जि.प. उपाध्यक्ष सुधाकर घारे, जि.प. सदस्या रेखा ठाकरे, कर्जत पं.स. सदस्या सुरेखा हरपुडे यांनी केले. कशेळे नाका येथे आदिवासी समाजाच्या महिलांनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर केली. तर आदिवासी गीतांवर आदिवासी तरुणांनी ठेका धरीत जवळपास एक तास नृत्य करीत आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा केला.

यावेळी कर्जत तालुका आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष भरत शिद, उपाध्यक्ष मंगल केवारी, रायगड जिल्हा आदिवासी संघटना अध्यक्ष मालू निरगुडा, ज्येष्ठ कार्यकर्ते सीताराम केवारी, माजी सरपंच दादा पादिर, बाळा पादिर, महिला आघाडी अध्यक्ष रेवता ढोले आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तर, आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष बुधजी हिंदोळा, रायगड जिल्हा अध्यक्ष जैतु पारधी, उपाध्यक्ष भगवान भगत, सचिव गणेश पारधी, चंद्रकांत पारधी, नामदेव निरगुड, बाळू ठोंबरे आदी उपस्थित होते.

Exit mobile version