| अलिबाग | प्रतिनिधी |
जेएसएम महाविद्यालयाच्या वतीने आंतराराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. ताडासन, वृक्षासन, पद-हस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोनासन, भद्रासन, वज्रासन, उस्त्रासन, मकरासन, भुजंगासन, सालभासन, सेतुबंधासन, उत्तानपदासन, कपालभाती, भ्रमारिका या योगांसह प्राणायामाचे धडे विद्यार्थ्यांनी घेतले. योगांचे शरीर व मनाला होणारे फायदे देखील स्पष्ट करण्यात आले.
संयुक्त राष्ट्र संघाने निर्धारीत केल्यानुसार, 2015 पासून 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या अनुषंगाने युवा व खेळ मंत्रालय भारत सरकार व मुंबई विद्यापीठ यांनी केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार जे. एस. एम. महाविद्यालयाच्या वतीने 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन सकाळी अलिबाग समुद्र किनारी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले, जिमखाना समिती प्रमुख डॉ. रवींद्र चिखले, महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, एनएसएस स्वयंसेवक सहभागी झाले. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात योगाभ्यास व प्राणायामचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी पतंजली योग समितीचे वरिष्ठ प्रशिक्षक गणेश वाघे तसेच गुरव व रमाकांत राऊत प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देत उत्तम आरोग्यासाठी नियमितपणे योगाभ्यास व प्राणायाम करावेत असे आवाहन केले. त्यानंतर सामूहिक प्रार्थना घेऊन प्रत्यक्ष योगाभ्यासाला सुरूवात करण्यात आली.
योग प्रशिक्षकांनी वेगवेगळ्या आसनांचा पद्धतशीर सराव करून दाखवला. विविध आसनांचा उपयोग, अनेक रोग बरे करण्यासाठी आणि मानवाच्या सर्वांगीण कल्याणासाठी योगाची उपयुक्तता याची माहिती दिली. सर्व सहभागींनी त्यांचे शरीर आणि मन निरोगी, तणावमुक्त आणि आनंदी राहण्यासाठी योगासन करत राहतील अशी शपथ घेतली. योगाभ्यासाचा नियमित सराव हा सर्वांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्याही चांगले जीवन प्राप्त करण्यास नक्कीच मदत करेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
जेएसएम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
