उमेदवारांच्या मनात धाकधूक

कोकण दिंड्या 18 नोव्हेंबरपासून निघणार

| नेरळ | प्रतिनिधी |

आळंदी येथील कार्तिकी एकादशीसाठी कोकणातून मोठ्या प्रमाणात वारकरी प्रस्थान करीत असतात. त्यात 26 नोव्हेंबर रोजी आळंदीमध्ये यात्रा असल्याने 18 नोव्हेंबरपासून दिंडी घेऊन वारकरी प्रस्थान करणार आहेत. त्यामुळे 20 नोव्हेंबर रोजी मतदानाचा टक्का घसरणार, अशी भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, वारकर्‍यांना कशा प्रकारे रोखणार, असा प्रश्‍न उमेदवार यांना पडला असून, रायगड जिल्ह्यातील सहा मतदारसंघात वारकरी वारीसाठी निघाले तर काय करणार? यावर उमेदवार विचार करू लागले आहेत.

आळंदी येथे होणार्‍या कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी वारकर्‍यांच्या दिंड्या मार्गस्थ होण्यास तयार होत आहेत. 26 नोव्हेंबर रोजी आळंदी येथे एकादशीसाठी वारकरी जाणार आहेत. त्यासाठी आतापासूनच वारकरी निघू लागले आहेत. कर्जत, उरण, पनवेल, पेण, अलिबाग आणि श्रीवर्धन याशिवाय मुरबाड, अंबरनाथ, कल्याण या मतदारसंघातील वारकरी प्रस्थानाच्या तयारीत आहेत. कोकणातील दूरवरच्या ठिकाणांहून येणार्‍या दिंड्या 18 आणि 19 नोव्हेंबरला निघणार असून, जवळपासच्या भागातील दिंड्या मतदान झाल्यानंतर म्हणजे 21 नोव्हेंबरला निघतील. यामुळे अनेक वारकरी मतदान करू शकणार नाहीत, असे अनुमान व्यक्त केले जात आहे. त्यामुळे मतदानाच्या टक्क्यावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे.

कार्तिक वद्य त्रयोदशीला आळंदी येथे ज्ञानोबा माऊली संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात आणि लाखो वारकरी यांच्या उपस्थितीत साजरा होतो. कार्तिकी एकादशी ते त्रयोदशी म्हणजे 26 ते 28 नोव्हेंबर रोजी हा सोहळा संपन्न होणार असून, 26 तारखेला पायी दींड्या आळंदी येथे पोहोचतील, असे नियोजन दिंडीचालक करीत असतात. कार्तिकी पायी दिंडी संजीवन समाधी सोहळा आळंदी येथे अत्यंत मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहाने साजरा केला जातो. संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी कार्तिकी एकादशीच्या दिवशी संजीवन समाधी घेतली होती, आणि या स्मृतीप्रित्यर्थ हा सोहळा दरवर्षी कार्तिकी एकादशीला वारकरी संप्रदायासाठी एक महत्त्वपूर्ण धार्मिक कार्यक्रम असतो. आळंदीमध्ये या दिवशी लाखो भक्त जमा होतात आणि विविध ठिकाणांहून पायी दिंडीचे आयोजन केले जाते. या दिंड्या मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने आळंदीच्या दिशेने मार्गक्रमण करतात. संपूर्ण मार्गात वारकरी भजन, कीर्तन, आणि अभंग गात, संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या शिकवणीचा प्रचार करतात. हा सोहळा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, समाजात एकता, प्रेम, आणि अध्यात्मिकतेचा प्रसार करण्याचा एक उपक्रम आहे.

गेली साडे सातशे वर्ष संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. संजीवन समाधी सोहळ्याला प्रत्यक्ष पांडुरंग एकादशी ते त्रयोदशी आळंदी येथे असतात. अशी वारकर्‍यांची भावना आहे. लांबच्या दिंड्या या निवडणुकीपूर्वी निघणार असतील शासनाने विचार करणे गरजेचे होते. मात्र, जवळपासच्या दिंडी या मतदानानंतर निघू शकतात.

Exit mobile version