| वाशी | वार्ताहर |
नेरुळ येथील टीएस चाणक्य परिसरात फ्लेमिंगोंचा अधिवास आहे. मात्र, अज्ञातांकडून या परिसरातील 100 हून अधिक खारफुटीची झाडे रात्रीच्या वेळी तोडण्यात आली आहेत. या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निसर्गप्रेमी संस्था आक्रमक झाल्या आहेत. तसेच, प्रत्येक रविवारी तलाव संवर्धनासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
नेरुळ येथील टीएस चाणक्य सागरी प्रशिक्षण संस्थेच्या मागे वसलेले सरोवराला चाणक्य तलाव संबोधित केले जाते. या तलावाची देखभाल तसेच सुरक्षेकडे सिडकोचे दुर्लक्ष झाले आहे. तसेच, स्थानिक नियोजन प्राधिकरण म्हणून नवी मुंबई महापालिकेकडे देखभाल व्यवस्था सुपूर्दही केलेली नाही. त्यामुळे सध्या या ठिकाणी एका बड्या बिल्डरच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून गस्त घालण्याचे काम सुरू आहे. अशातच डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात चाणक्य तलावाबाजूकडील शंभरहून अधिक पूर्ण वाढलेल्या खारफुटीच्या झाडांची रात्रीच्या वेळी अज्ञातांनी तोडली आहेत. यामुळे नवी मुंबई परिसरातील निसर्गप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, कांदळवन कक्ष आणि कांदळवन संरक्षण व संवर्धन समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, एका संस्थेकडून दुसऱ्या संस्थेकडे प्रकरण सोपवण्यात येत असल्याने आक्रमक झालेल्या पर्यावरण प्रेमींनी दर रविवारी सकाळी 8 वाजता निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे.
विविध संस्थांचा पाठिंबा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार टीएस चाणक्य तलावाचे संरक्षण आणि खारफुटीच्या नाशासाठी जबाबदार असलेल्यांविरुद्ध गुन्हे नोंदवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता या दोन्ही मागण्या पूर्ण होईपर्यंत पर्यावरणप्रेमी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला नवी मुंबई पर्यावरण संवर्धन संस्था, मॅग्रोव्ह सोलजर्स, पर्यावरण दक्षता मंडळ, येऊर एन्व्हायरमेंट सोसायटी, सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालय, राष्ट्र सेवा योजना यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
नवी मुंबई शहर ‘फ्लेमिंगो सिटी’ म्हणून घोषित झाले आहे. परंतु, या पक्षांचे नैसर्गिक अधिवास संरक्षित झाले नाहीत तर ही घोषणा केवळ कागदावरच उरेल. याकरिता महापालिकेने विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.
रोहित जोशी, पाणथळ समिती सदस्य, ठाणे
चाणक्य तलावातील खारफुटीऱ्हासाबद्दल सागरी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये संबंधित दोषी व्यक्तींवर गुन्हे नोंदवावे यासाठी पाठपुरावा करीत आहे. तसेच या तलावाच्या कायमस्वरूपी संरक्षणाकरिता उच्च न्यायालयात दाद मागितली जाणार आहे.
राहुल पाटोळे, पर्यावरण प्रेमी