| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचार, अनागोंदी कारभाराबाबत तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या बेकायदेशीर कारभाराबाबत त्यांच्याविरूद्ध कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी शासनाला पत्र पाठवून केली आहे. शासनाला लिहिलेल्या पत्रामध्ये सावंत यांनी याबाबत अनेक तक्रारी असून, विविध माध्यमांमध्ये गेली तीन वर्षे अनेक वृत्ते प्रसिद्ध झाली असल्याचे नमूद केले आहे.
अशा अधिकाऱ्याविरुद्ध तक्रारी होऊनही शासनाने काहीच कारवाई न केल्याने अखेर दोन दिवसांपूर्वी अलिबाग जिल्हा रूग्णालयात पोलिसांनी धाड टाकून एका कर्मचाऱ्याने पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांकडून खंडणी मागितल्याने त्याला अटक करण्यात आली असून, त्याला दि. 22 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेबाबत स्वतः पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. अर्थात, यामागील सूत्रधाराचा शोध पोलीस घेत असल्याबाबत वृत्ते प्रसिद्ध झाली आहेत. विशेष म्हणजे, नेमक्या अशा वेळी जिल्हा शल्य चिकित्सक सुहास माने हे दोन दिवसांच्या किरकोळ रजेवर गेले असल्याची माहिती सावंत यांनी सीव्हील सर्जन यांच्या कार्यालयात गुरुवार, दि. 18 रोजी भेट दिली असता त्यांना समजली. डॉ. रवींद्र रोकडे, बाह्य संपर्क निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी सावंत यांना ही माहिती दिली. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक या पदाचा तात्पुरता कार्यभारही डॉ. रोकडे यांच्याकडेच असल्याचे रोकडे यांनी सावंत यांना सांगितले.
वास्तविक पाहता, जिल्हा रुग्णालयामध्ये अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई हे असताना त्यांच्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्याकडे कार्यभार देण्याची डॉ. सुहास माने यांची कृती बेकायदेशीर असून, याबाबत शासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय बिलांच्या पूर्ततेसाठी पैसे घेतले जातात, कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करण्यासाठी पैसे घेतले जातात, कंत्राटी डॉक्टरांच्या वेतनसाठी पैसे घेतले जातात, रुग्णालयातील विविध ठेकेदारांकडून पैसे घेतले जातात, अशा प्रकारच्या चर्चा नेहमीच सुरू असतात, तसेच तशी वृत्तेही वर्तमानपत्रांमध्ये वारंवार छापून आलेली आहेत, असेही सावंत यांनी शासनाला लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचार, अनागोंदी कारभाराबाबत तसेच जिल्हा शल्य चिकित्सक सुहास माने यांच्या बेकायदेशीर कारभाराबाबत कडक कारवाई होण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती सावंत यांनी शासनाला केली आहे.