ॲड. रेवण भोसले यांची मागणी
| धाराशिव | प्रतिनिधी |
राज्याच्या आरोग्य खात्यात भ्रष्टाचाराने थैमान घातले असून अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढत्यांचा मंत्रालयात बाजार भरलेला आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचे कुरण बनलेल्या आरोग्य मंत्रालयात होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी समाजवादी पक्षाचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
राज्याच्या आरोग्य मंत्रालयात कधी नव्हे एवढा सावळा गोंधळ निर्माण झाला असून कोणाचेही या खात्यावर नियंत्रण राहिल्याचे दिसून येत नाही. ड्रग माफिया हे प्रकरणही आरोग्य विभागाशी संबंधित असून पोलिसाइतकेच संबंधित खात्याचे मंत्री व अधिकारीही त्यास जबाबदार आहेत. नियमबाह्य बदल्या व बढत्या हा एक आरोग्य विभागात मोठा धंदा बनला असून या उद्योगाचे संचालक संबंधित खात्याचे मंत्री असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. महाराष्ट्रातील एकूण 1200 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे समावेशन करण्यासाठी लाखो रुपयांचा व्यवहार चालू आहे. महात्मा ज्योतिराव फुले योजना लागू करण्यासाठी खाजगी रुग्णालयाकडून प्रति बेड एक लाख रुपये घेतले जातात म्हणजेच या योजनेत बोगस लाभार्थ्यांची खोटी बिले, खोटे रुग्ण यावरही मोठे गैरव्यवहार होत आहेत. असे रेवण भोसले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आरोग्य खात्याची दोन्ही संचालक पदेही रिक्त असून त्याचा लिलाव पद्धतीने सौदा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भ्रष्टाचार व सावळा गोंधळामुळे आरोग्य खाते पूर्णपणे सडले आहे. कनिष्ठ अधिकाऱ्यांना बेकायदेशीपणे जिल्हा शल्यचिकित्सकपदी नियुक्ती देऊन केवळ आर्थिक गैरव्यवरामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यावर अन्याय केला जात आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या उपसंचालकांच्या जागांसाठी गैरव्यवहार होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. राज्याच्या आरोग्य खात्यात भ्रष्टाचाराने सर्व सीमा पार केल्या असून जनतेच्या जीवन मरणासी व संवेदनशील असणाऱ्या खात्यात होत असलेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी ॲड भोसले यांनी केली आहे.