मोदी सरकारच्या खोट्या घोषणांची पोलखोल करा

रवी मिलन जनसंपर्क अभियानात पदाधिकाऱ्यांना आवाहन

| उरण | वार्ताहर |

देशातील जनतेला अच्छे दिन आणि अनेक खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला दहा वर्षे होत आहेत. या दहा वर्षात फक्त मोदी सरकार खोटे बोलून जनतेची दिशाभुल करत आहे. विकास कामांच्या नावाने बोंबाबोंब आहे. महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली, दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे शेतकरी संकटात आहे. यामुळे लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. मोदीजी क्या हुआ तेरा वादा असे म्हणत मोदी सरकारच्या धोरणावर जोरदार टीका महाराष्ट्र प्रदेश सेवादलाचे उपाध्यक्ष प्रकाश पेवेकर यांनी केली. उरण येथील काँग्रेसच्या कार्यालयात शनिवारी रवी मिलन जनसंपर्क अभियान राबवण्यात आले त्याप्रसंगी पेवेकर बोलत होते. मोदी सरकारच्या खोट्या घोषणांची यावेळी त्यांनी पोलखोल केली. मोदी सरकार, केंद्र सरकार खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. मोदी सरकारचे खरा चेहरा सर्वांसमोर आणा, असे आवाहन त्यांनी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.

पेवेकर यांच्याहस्ते उरण तालुक्यातील महिलांना साडीचे वाटप करण्यात आले. नंतर नवीन कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. दीपक ठाकूर सेवा दल रायगड जिल्हा उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर पाटील सेवा दल रायगड जिल्हा सरचिटणीस, रमेश पाटील जासई विभागीय सेवा दल अध्यक्ष, सुनील काटे उरण तालुका सेवादल उपाध्यक्ष, वंदना म्हात्रे जासई विभागीय सेवा दल अध्यक्ष, जी.डी.पाटील, महालन विभाग अध्यक्ष, प्रीती पाटील चाणजे विभागीय अध्यक्ष यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. सदर कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

सेवादलचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजीभाई देसाई, प्रदेश सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे, रायगड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, महाराष्ट्र राष्ट्रध्वज प्रभारी प्रमोद कदम, रायगड जिल्हा सेवा दलचे अध्यक्ष कमलाकर घरत तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे उपस्थित होते.

Exit mobile version