| नाशिक | प्रतिनिधी |
राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूप्रकरणाची आता एसआयटी मार्फत चौकशी केली जाणार आहे. तशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे केली आहे.
राजापूर येथील रिफायनरी प्रकल्पावरुन वारिसे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. मात्र तो घातपात असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी आरोपी पांडुंरग आंबेरकर याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा यापूर्वीच दाखल केला आहे. या हत्येवरुन पत्रकार संघटनांनी आवाज उठविताच गृहमंत्री फडणवीस यांनी तातडीने एसआयटीमार्फत तपास करण्याचे निर्देश दिले. तसेच फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण निकालात काढण्याचे सुचित केले.
दरम्यान, शनिवारी पत्रकार वारिसे यांच्या मारेकर्यांना अटक करा या मागणीसाठी रिफायनरी विरोधकानी राजापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदविला. वारिसे यांच्या संशयास्पद मृत्यूमागील सूत्रधार कोण? याचा शोध घ्या अशा घोषणा आंदोलकांच्यावतीने देण्यात आल्या.
पत्रकार शशिकांत वारिसे यांच्यावर हल्ला करणार्याला कोणत्याही प्रकारे पाठिशी घातलं जाणार नाही. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला कायद्यानुसार शिक्षा होणारच.
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री