घातक स्टेरॉईड इंजेक्शन चोरी प्रकरणातील तपास ठप्प; आरोपीने गाठला दवाखाना

। पेण । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यामध्ये गेली दोन महिने गाजत असलेले प्रकरण म्हणजे घातक स्टेरॉईड इंजेक्शन चोरी. यामध्ये पेण मनसे विद्यार्थी संघटनेचे सचिव निकेश पाटील हे पोलिसांच्या ताब्यात आल्या नंतर या प्रकरणाला वेग मिळाला. आरोपीसाठी पोलिसांनी न्यायालयाकडे सहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली.

या पोलीस कोठडीच्या दरम्यान निकेश पाटील यांनी दुसर्‍या आरोपीचे नाव सांगितले, ते म्हणजे जाफर फारूक मेमन. हा मालाडचा रहिवासी असून पोलिसांनी मुंबई, कांदिवली परिसरातून त्याला ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाकडून त्याला 8 सप्टेंबर पर्यत पोलीस कोठडी देण्यात आली.

पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरून मुंबई गाठली; मात्र आरोपी जाफर फारूक मेमन यांनी आपल्या छातीत दुखत आहे, असे सांगून जे.जे. हॉस्पिटल गाठले. या दरम्यान त्याला न्यायालयीन कोठडी देखील देण्यात आली. त्यामुळे कळत न कळत या गुन्हयाचा तपास मंदावला. या गुन्हयामध्ये पोलिसांनी नव्याने औषध व अन्न प्रशासनाच्या सहकार्याने गुन्ह्याची नोंद केली.

आरोपी फारूक मेमन याला पोलीस कोठडी मिळाल्यापासून तपासात कोणतीच नवीन प्रगती नाही. तर यातील पहिला आरोपी निकेश पाटील हा न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला अजून जामिन मिळालेला नाही. 21 सप्टेंबरला पुन्हा निकेशच्या जामिन अर्जावर सुनावनी असल्याचे समजते. परंतु सदरील औषधे कोठून आली, या बाबत पोलीसांच्या हातात ठोस कोणतेच धागे दोरे नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

या प्रकरणातील आरोपी हे घातक स्टेरॉईड गुगल वरील एक प्रोडक्ट विक्रेती वेबसाईट इंडिया स्मार्टवरून मागवत होते, अशी प्रथम दर्शनी माहिती मिळत आहे. त्या वेबसाईटवर कोणत्याही प्रकारची उत्पादने सहज उपलब्ध होत आहेत. याचाच फायदा घेउन या प्रकरणातील आरोपी हे घातक स्टेरॉईड मागवत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु त्यांच्याकडे असे कोणतेच ठोस पुरावे नाहीत. परिणामी या प्रकरणात पोलीस खात्याने खोलवर चौकशी करून आरोपींना जास्तीत जास्त शासन व्हावा, अशी मागणी पेणमध्ये जोर धरू लागली आहे.

Exit mobile version