एसटी संपामुळे खाजगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
एसटी संपाचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला आहे. अलिबाग ते पनवेल या मार्गावर नियमित प्रवास करणार्या प्रवाशांना एका वेळेसाठी 200 ते 250 रूपये खासगी वाहतूकदार यांना द्यावे लागत आहेत. खासगी वाहतूकदारही संपाचा पुरेपूर फायदा घेत प्रवाशांची लुट करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती यांची दखल घेत प्रादेशीक परिवहन विभागाने (आरटीओ) घेत अलिबागमध्ये खाजगी वाहतूक दारांची तपासणी करीत योग्य ते भाडे घेण्याचे आदेश दिले. एसटी संप सुरु होऊन चौथा दिवस उगवला तरी कर्मचारी संघटनेने आपले आंदोलन सुरुच ठेवल्याने एसटी वाहतून पुर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवांशाना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. याच गोष्टीचा फायदा घेत खाजगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लुट करण्यास सुरुवात केली आहे. अलिबाग पनवेल मार्गासाठी तब्बल 200 ते 250 रुपये घेतले जात आहे. त्यामुळे प्रवाशी मेताकुटीला आले आहेत. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर त्याची दखल घेत पेण येथील प्रादेशिक परिवहन विभागाने अलिबाग येथे भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्येक वाहनचालकाला अडवून त्याला समज देत प्रवाशांकडून योग्य तेच भाडे आकारण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. यापूढे देखील खाजगी वाहतूकदारांकडून होणारी लुट थांबेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.