आयपीएलसदृश टी-20 लीग; कसोटी मालिका वार्‍यावर

। सेंच्युरियन । वृत्तसंस्था ।

क्रिकेट साऊथ आफ्रिका म्हणजेच दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. हा संघ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. हा ‘अ’ संघ तर नाही ना? अशी शंकाही अनेकांनी व्यक्त केली. पण प्रत्यक्षात हा दक्षिण आफ्रिकेचाच संघ आहे पण कोणतेही प्रमुख खेळाडू या संघात नाहीयेत. याचं कारणही स्पष्ट झालं आहे. ही कसोटी मालिका होणार आहे त्या काळात दक्षिण आफ्रिकेत आयपीएलच्या धर्तीवर होणारी ट्वेन्टी लीग रंगणार आहे. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यांच्या बरोबरीने जगभरातील ट्वेन्टी विशेषज्ञ खेळाडूही या स्पर्धेत खेळताना दिसतील

डोमेस्टिक ट्वेन्टी लीगसाठी राष्ट्रीय संघ कमकुवत पाठवण्याचं काय कारण असा प्रश्‍न चाहते विचारु लागले आहेत. ट्वेन्टी लीग आणि कसोटी मालिका एकाचवेळी येणार हे माहिती होतं तर कसोटी मालिकेचा कार्यक्रम पुढेमागे करता आला असता. पण तसं करण्याऐवजी दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डाने अनुनभवी असा संघ न्यूझीलंडच्या दौर्‍यावर पाठवण्याचं पक्कं केलं आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत खेळणार्‍या संघापैकी कीगन पीटरसन आणि डेव्हिंग बेडिंघम यांचा या मालिकेसाठी समावेश करण्यात आला आहे. या दोघांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेले झुबेर हमझा, ड्युऑन ऑलिव्हर, डेन पॅटरसन, डेन पीट, खाया झोंडो हे या संघात असणार आहेत.

एसए ट्वेन्टी लीग 10 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत सहा संघ आहेत. विशेष म्हणजे सहाही संघ हे आयपीएल संघमालकांनीच खरेदी केले आहेत. डरबान सुपर जायंट्स, जोहान्सबर्ग सुपर किंग्स, एमआय केपटाऊन, पार्ल्स रॉयल्स, प्रिटोरिया कॅपिटल्स, सनरायझर्स इस्टर्न केप अशी संघांची नावं आहेत. दक्षिण आफ्रिकेचे सगळे प्रमुख खेळाडू या लीगचा भाग असतील. बोर्डानेच त्यांना या लीगमध्ये खेळण्याची सूचना केली आहे. त्यामुळे कसोटी मालिकेसाठी दुय्यम दर्जाचा संघ निवडण्यात आला आहे.

Exit mobile version