इर्शाळवाडी दुर्घटना! आर्थिक मदत, पुनर्वसनासाठी युध्दपातळीवर प्रयत्न

निवासी उपजिल्हाधाकारी संदेश शिर्के यांची माहिती
| रायगड | खास प्रतिनिधी |
इर्शाळवाडी येथील बचाव कार्य थांबवण्यात आल्यानंतर आता प्रशासनाने आर्थिक मदत, तात्पुरते पुनवर्सन आणि कायमस्वरुपी पुनर्वसनावर लक्ष केंद्रीत केले आहे. दुर्घटनेतील 27 मृत व्यक्तीच्या वारसांना पाच लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देणे, तसेच 57 बेपत्ता असलेल्यांच्या वारसांनाही आर्थिक मदत देणे आणि इर्शाळवाडीच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन जमीन मागणीचा प्रस्ताव सरकारला पाठवण्यात येणार असल्याची माहिती निवासी उप जिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी कृषीवलशी बोलताना दिली.

तब्बल 27 जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात बचाव पथकाला यश आले होते. मात्र सतत पडणारा पाऊस आणि घटनास्थळी बचाव कार्यासाठी कोणतीच यंत्र सामुग्री नेता येत नसल्याने बचाव कार्यात अडथळे येत होते. मनुष्यबळाच्या आधारे मदत कार्य सुरु असताना मृतदेहांचे हात-पाय सापडत होते. मृतदेहाची विटंबना होऊ नये यासाठी रविवारी सायंकाळनंतर मदत व बचाव कार्य थांबवण्यात येत असल्याचे रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले.

मृतांच्या वारसांना मदत करणे आणि त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन कसे होईल याकडे सरकार आणि प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. या दुर्घटनेमध्ये 27 जणांचे मृतदेह ढिगाऱ्या खालून बाहेर काढण्यात आले. त्यांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत देणे तसेच जे 57 जण बेपत्ता होते त्यांच्या वारसांना देखील आर्थिक मदत तातडीने देणे गरजेचे आहे. तात्पुरते आणि कायम स्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

चौक येथे पुनर्वसन
जुना मुंबई महामार्गावर चौक येथे इर्शाळ वाडीचे कायम स्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ज्या नवीन जागेत कायम स्वरुपी पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्या जागेचा भूवैज्ञानिक विभागाचा अहवाल आज उशिरा सायंकाळ पर्यंत मिळणार आहे. त्यानंतर तातडीने सदरचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचे शिर्के यांनी सांगितले. दरडग्रस्तना लागणारी सर्वोतोपरी मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासन तयार आहे. त्यामध्ये कोणतीच कमतरता भासणार नाही, असेही शिर्के यांनी स्पष्ट केले.

मदतीचा ओघ सुरूच
दरडग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी केले आहे. त्यानंतर मदतीसाठी हजारो हात पुढे आले आहेत. विविध संस्था, सामाजिक संघटना यांनी वस्तू, कपडे, अन्न पाकीटे तसेच धनादेश स्वरुपात मदत देण्यास सुरुवात केली आहे. संबंधीत मदत इर्शाळ वाडीतील दरडग्रस्तांपर्यंत कशी पोचेल यांचे काटेकोरपणे नियोजन करण्यात आले आहे. मजत वाटपात गडबड गोंधळ होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सुचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

Exit mobile version