छगन निर्गुडा यांचा शासनाला उद्विग्न सवाल
। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेलपासून 16 कि.मी. अंतरावर असलेले माचीप्रबल हे 400 हून अधिक लोकसंख्येचे गाव. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे उलटून गेली तरी अद्याप या वाडीवर कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध नसून, दुर्लक्षित राहिली आहे. या वाडीवर जाण्यासाठी अद्याप पक्का रस्ता नाही. शासनाच्या कोणत्याच योजना या ठिकाणी पोहोचलेल्या नसून, अनेक अडचणींचा सामना येथील रहिवाशांना करावा लागत आहे. त्यामुळे डोंगरावर राहणे आमचा गुन्हा आहे का? असा उद्विग्न सवाल येथील रहिवासी छगन निर्गुडा यांनी शासनाला केला आहे. कोणी आजारी पडल्यास किंवा गरोदर महिलेस प्रसूतीसाठी डोली करुन दोन-दोन तास पायी पायपीट करुन रुग्णालयात न्यावे लागते. जर रुग्णास वेळेत उपचार मिळाले नाही, तर रुग्ण दगावण्याची शक्यता असते. आजतागायत आमच्या अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे निर्गुडा यांनी सांगितले.
उन्हाळी पिण्यासाठी आम्हाला वणवण भटकावे लागते. पाण्याची समस्या याठिकाणी गंभीर आहे. आमच्या गावात शाळा नसल्याने मुलांना शिकण्याची इच्छा असूनही शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे युवा पिढीचे नुकसान होत आहे. ही परिस्थिती पनवेलमधील लोकप्रतिनिधींना माहीत असूनही, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आमच्या गावाच्या वरती प्रबळगड आणि कलावंती दुर्ग ही ऐतिहासिक ठिकाणे आहेत. याठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. परंतु, एखाद्यास दुर्दैवाने अपघात झाल्यास गाडीपर्यंत डोली करुन घेऊन जाताना आम्हाला अडचणी येतात. रात्री-अपरात्री काही दुर्घटना घडल्यास बॅटरी किंवा मोबाईच्या लाईटवर डोंगर उतरावा लागतो. या सर्व गंभीर समस्यांकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी निर्गुडा यांनी केली आहे.
- शासनाच्या कोणत्याही योजना अद्यापपर्यंत आमच्या पोहाचलेल्या नाहीत. लोकप्रतिनिधीसुद्धा लक्ष देत नाहीत. त्यामुळे अनेक सोयी-सुविधांपासून आम्ही वंचित आहोत. तात्काळ उपाययोजना व्हाव्यात एवढीच अपेक्षा. – छगन निर्गुडा, रहिवासी