| उरण | प्रतिनिधी |
नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक असताना जल्लोषाची तयारी सुरू झाली आहे. मात्र, या आनंदाच्या काळातच बनावट दारूचा काळाबाजार फोफावण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली असून, जनतेच्या जीवाशी सरळसरळ खेळ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या दारू माफियांवर शासकीय यंत्रणेचा वरदहस्त आहे का, असा संतप्त प्रश्न उरणकरांकडून उपस्थित होत आहे.
नाताळ व थर्टी फस्ट या काळात दारूची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे हाच काळ साधून काही दारू विक्रेते नामांकित ब्रँडच्या नावाखाली भेसळयुक्त व बनावट दारूची विक्री करीत असल्याचे चित्र उरण तालुक्यात वारंवार दिसून येत आहे. येथील अनेक बारमध्ये खुलेआम बनावट दारू पाजली जात असल्याच्या तक्रारी असूनही, संबंधित यंत्रणा डोळेझाक करत असल्याचा आरोप उरणकरांकडून होत आहे. त्याचबरोबर तालुक्यात शासकीय जागांवर बेकायदेशीरपणे उभारलेल्या ढाबे, हॉटेल्स व फार्महाऊसवर विनापरवाना दारू विक्री सुरू आहे. याबाबत अनेकदा तक्रारी, निवेदने आणि वृत्त प्रसिद्ध होऊनही ठोस कारवाई होत नसल्याने संशय अधिकच बळावत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काही दारू विक्रेत्यांकडून दर महिन्याला हप्ता दिला जातो, म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही, अशी दरपोक्ती करत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे बनावट दारू विक्रेत्यांना शासकीय यंत्रणेचा वरदहस्त आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.







