पनवेलचे तहसीलदार अडचणीत?

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

अधिकारात क्षेत्रात नसताना जमीन हस्तांतरणाचे आदेश दिल्याचा आरोप

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अधिकारात नसताना पनवेलच्या तहसीलदारांनी आडीवली धानसर येथील जमीन हस्तांतरणाचे आदेश दिल्याचा आरोप एका संघटेनेकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. तहसीलदार जितेंद्र इंगळे यांची समितीमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ते मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. इंगळे यांची समितीमार्फत चौकशी सुरू झाली असून, या चौकशीनंतरच हा प्रकार समोर येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल तालुक्यातील आडीवली धानसर येथील सर्वे नंबर 111 क्षेत्र 0.44.00 हे. आर. ही 40 कोटी किंमत असलेली जमीन तहसीलदार पनवेल (शहर) मीनल भामरे यांच्या अधिकार क्षेत्रात येते. तहसीलदार मीनल भामरे या कर्तव्यावर असताना 8 ऑक्टोबर 2025मध्ये त्यांच्या अपरोक्ष अपर तहसीलदार पनवेल (ग्रामीण) जितेंद्र इंगळे यांनी आपल्या नियत अधिकार क्षेत्राच्या मर्यादा ओलांडल्याचा प्रताप समोर आला आहे. या जमिनीसंदर्भात जाणीवपूर्वक व हेतूपुरस्कर भ्रष्ट मार्गाने वर्ग 2 चे रूपांतर वर्ग 1 मध्ये करण्यासाठी 12 लाख 99 हजार रुपयांचे चलन सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने अनधिकारे भरून घेतले. सातबारामधील इतर अधिकारातील सक्षम प्राधिकारी यांच्या परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदीचा शेरा कमी करण्याचे आदेश अनधिकारे संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना दिले.

9 ऑक्टोबर 2025 रोजी तहसीलदार पनवेल (शहर) मीनल भामरे या उपस्थित असताना त्यांच्या अपरोक्ष आपल्या नियत अधिकार क्षेत्राच्या मर्यादा ओलांडून आदेशाची फेरफार नोंद अनधिकारे स्वतःच्या ऑनलाईन थंबने केली. या जमिनीसंदर्भात आदेश देण्याचे अधिकार जितेंद्र इंगळे पाटील यांना नाहीत, हे आडीवली येथील तलाठी हेमलता सत्यवान राणे व मंडळ अधिकारी तळोजा हौशाबापू निवृत्ती सरगर यांना माहिती असूनही त्यांच्या आदेशानुसार फेरफार नोंद घेतली. त्यामुळे तलाठी व मंडळ अधिकारी यांनी देखील मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जात आहे.

महाराष्ट्र शासन महसूल विभागाने 7 ऑक्टोबर रोजी मीनल भामरे यांना तहसीलदार पनवेल (शहर) या पदावर रुजू होण्यासाठी आदेश जारी केले होते. त्या रुजू होण्यापूर्वीच ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा हेतूपुरस्पर प्रयत्न तहसीलदार इंगळे यांनी केला. परंतु, त्यात यश आले नाही, म्हणून ही गंभीर स्वरूपाची चूक करणे भाग पडले. अपर तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांच्यासह तलाठी व मंडळ अधिकारी यांनी देखील या प्रकरणात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जितेंद्र इंगळे पाटील यांचा हा एकाच आठवड्यात दुसरा मोठा घोटाळा समोर आला आहे. त्यामुळे अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने अनेक जमिनीसंदर्भात आदेश काढले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी आदिवासी आदिम सामाजिक संस्थेच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. कोकण आयुक्तांनीदेखील सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन सामाजिक संस्थेला दिले आहे. त्यानुसार तहसीलदार यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्यात आली असून, त्यासाठी समिती गठीत केली आहे. समितीमार्फत तहसीदारांची चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे तहसीलदार इंगळे अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अधिकार क्षेत्र ओलांडून दुसऱ्या तहसीलदारांच्या अधिकार क्षेत्रातील जमीन हस्तांतरांसंदर्भात अनधिकारे आदेश दिल्याचा आरोप खोटा आहे. याबाबत कोणताही चुकीचा प्रकार केला नाही. याबाबत समितीमार्फत चौकशी सुरू आहे. या चौकशीला समोरे जाणार आहे.

-जितेंद्र इंगळे,
तहसीलदार, पनवेल

Exit mobile version