| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धडक कारवाई केल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या चर्चेनंतर अनेक हॉटेल्स, पानटपऱ्या, फास्टफूड सेंटर आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. काही व्यावसायिकांनी तर घाईघाईने दुकाने बंद ठेवल्याचेही दिसून आले. मात्र, एवढा गाजावाजा झाल्यानंतरही अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा अधिकृत तपशील जाहीर न केल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उरणमध्ये नेमक्या किती हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकऱ्या, पानटपऱ्या आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली? किती अन्ननमुने घेण्यात आले? ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले का? किती नमुने निकृष्ट आढळले? किती जणांना नोटिसा देण्यात आल्या? किती आस्थापनांवर दंडात्मक कारवाई झाली? किती परवाने निलंबित किंवा रद्द करण्यात आले? या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर प्रशासनाने अद्याप दिलेले नाही. विशेष म्हणजे, धाड पडल्याची माहिती मिळताच काही व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली, अशी चर्चा असूनही प्रशासनाकडून त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे कारवाई प्रत्यक्षात झाली की केवळ धाड टाकल्याचा दिखावा करण्यात आला? असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न हा कोणत्याही विभागासाठी केवळ कागदोपत्री कारवाईचा विषय नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने उरणमधील तपासणीचा संपूर्ण तपशील तातडीने प्रसिद्ध करावा. कारवाई झाली असेल तर ती जनतेसमोर आणावी आणि नसेल तर त्यामागील कारणे स्पष्ट करावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
उरणमध्ये अन्न सुरक्षा विभागाची ‘सेटिंग’?
