राजकीय पदाधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील धुतुम गावात सिडकोच्या मोकळ्या जागेवर सुमारे 3 ते 4 एकर क्षेत्रावर खारफुटीची कत्तल करून भराव टाकत अनधिकृत पार्किंगचा व्यवसाय सुरू केल्याचा गंभीर आरोप होत असून, या प्रकरणात माजी सरपंच व उपसरपंच असलेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. काही राजकीय नेतेच सिडको अधिकाऱ्यांची दलाली करून त्यांना लाखोंचा मलिंदा देत असल्याचीही चर्चा परिसरात रंगू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोच्या मालकीच्या अनेक मोकळ्या जागांवर काही भूमाफियांकडून बेकायदेशीर कब्जा करण्यात आला आहे. या जागांवर खारफुटीची कत्तल करून मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला असून त्यावर अनधिकृत पार्किंग तसेच इतर गैरधंदे सुरू करून त्या जागा भाड्याने दिल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्किंगच्या माध्यमातून संबंधितांना दरमहा लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
या सर्व प्रकाराकडे सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडून आर्थिक साटेलोटामुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.धुतुम येथील माजी सरपंच व उपसरपंच असलेल्या काही राजकीय पदाधिकाऱ्यांनीही सुमारे 3 ते 4 एकर जागेवर खारफुटीची कत्तल करून भराव टाकत ती जागा पार्किंगसाठी भाड्याने दिल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे, एकीकडे सिडकोविरोधात ग्रामस्थांना भडकावून आंदोलने उभी करायची आणि दुसरीकडे सिडकोच्याच जागेवर अतिक्रमण करून स्वतःचा स्वार्थ साधायचा, असा दुहेरी डाव काही राजकीय पदाधिकारी खेळत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. स्थानिकांच्या मते, गेल्या 10 ते 15 वर्षांपासून या जागेवर अनधिकृत पार्किंगचा व्यवसाय सुरू असूनही सिडकोच्या अतिक्रमण विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. उलटपक्षी, ज्यांच्याकडून आर्थिक फायदा होत नाही अशा टपरीधारकांवर किंवा छोट्या पार्किंग व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर धुतुममधील सिडकोच्या तीन ते चार एकर जागेवरील अनधिकृत पार्किंग प्रकरणाची चौकशी करून संबंधित राजकीय पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता उरण तालुक्यातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
