इशान किशनचे मैदानात पुनरागमन

| मुंबई | वृत्तसंस्था |

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनने अखेर मंगळवारी (दि.27) डी.वाय. पाटील टी-20 चषकात स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. इशानने भारताच्या दक्षिण आफ्रिका दौर्‍यात मध्यंतरी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून, अफगाणिस्तानविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेत आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्पष्ट केले होते की, राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यासाठी त्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे क्रिकेट खेळावे लागेल. तीन महिन्यांच्या ड्रामानंतर मंगळवारी इशान नवी मुंबईतील डी.वाय. पाटील टी-20 चषक स्पर्धेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) संघासाठी रूट मोबाइल लिमिटेडविरुद्ध खेळताना दिसला. पण तो त्या सामन्यात एकदम फ्लॉप दिसला. मिडऑफमध्ये मॅक्सवेल स्वामीनाथनला मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्नात 11 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. आरबीआयच्या 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या षटकात इशानची विकेट पडली.

Exit mobile version