ईश्‍वरी, तेजस्विनीची महाराष्ट्र संघात निवड

। नाशिक । प्रतिनिधी ।

नाशिकच्या ईश्‍वरी सावकार व तेजस्विनी बाटवाल या दोन क्रिकेटपटूंची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे आयोजित कोलकता येथील वरिष्ठ महिला टी-20 स्पर्धेत या दोघी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ईश्‍वरी व तेजस्विनीने यापूर्वीदेखील महाराष्ट्रातर्फे वरिष्ठ व एकोणीस वर्षांखालील तसेच विविध वयोगटात महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

सलामीची फलंदाज ईश्‍वरी सावकारने 19 वर्षाखालील महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषविले आहे. 2023 मध्ये झालेल्या महिलांच्या 23 वर्षांखालील वयोगटात बीसीसीआयतर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमीच्या राष्ट्रीय पातळीवरील हाय परफॉर्मन्स शिबिरासाठी तिची निवड झाली होती. याआधीच्या दोन हंगामात शिबिरात तिची निवड झालेली होती. ऑक्टोबर 2022 मध्ये महिला टी-20 सामन्यांच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी 19 वर्षांखालील इंडिया ‘अ’ संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली होती. या स्पर्धेत श्रीलंका, वेस्ट इंडिज संघाविरुद्ध सामने झाले होते. तेजस्विनी बाटवाल यष्टीरक्षक व फलंदाज असून तिने यापूर्वी महाराष्ट्रातर्फे 19 वर्षांखालील तसेच विविध वयोगटात प्रतिनिधित्व केले आहे. यापूर्वीच्या हंगामात राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धेतील या खेळाडूंची सातत्यपूर्ण, लक्षणीय कामगिरी विचारात घेऊन निवड झाली आहे.

पुणे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सोळा सदस्य संघाची निवड घोषित केली आहे. अनुजा पाटील ही कर्णधार आहे. कोलकत्यात महाराष्ट्र संघाची लढत 20 ऑक्टोबरला उत्तर प्रदेश होईल. 22 ऑक्टोबरला अरुणाचल प्रदेश, 24 ऑक्टोबरला विदर्भ, 26 ऑक्टोबरला उत्तराखंड आणि 28 ऑक्टोबरला कर्नाटकविरुद्ध लढत होणार आहे

Exit mobile version