आ. रमेश पाटील यांची मागणी
| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील बांधवांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र तसेच इतर शासकीय योजनांचे लाभ देण्याकरिता बैठक आयोजित करावी अशी मागणी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व विधानपरिषद आमदार रमेशदादा पाटील यांनी केली.
महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, मन्नेरवारू या जमातीच्या बांधवांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने समाज बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. दाखले मिळत नसल्यामुळे शासकीय योजनांपासून हा समाज बांधव वंचित राहिला आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुुलभरित्या मिळण्याकरिता वारंवार अनुसूचित जमातीतील बांधवांकडून मागणी होत आहे. यावर आ.रमेश पाटील यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहात आवाज उठविला. अनुसूचित जमातीच्या बांधवांवर अन्याय होत असून गेल्या 40 वर्षापासून दाखल्यांसाठी समाजातील लोक संघर्ष करीत असल्याचे वास्तव सभागृहात मांडले.
त्याचप्रमाणे काही अधिकार्यांकडून जाणीवपूर्वक द्वेषबुद्धीने अनुसूचित जमातीतील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, मन्नेेरवारू या जमातीच्या बांधवांवर अन्याय केला जात असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्याकरिता आणि शासकीय योजनांचा लाभ मिळण्याकरिता शासनाने तात्काळ बैठक आयोजित करावी अशी मागणी केली. यावेळी मंत्री महोदयांनी अनुसूचित जमातीतील बांधवांच्या सदरच्या प्रश्नासंदर्भात बैठक आयोजित करण्यात येईल असे सभागृहात सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून अनुसूचित जमातीमधील लोकांना दाखले देणे बंद केले आहे.परंतु आमदार रमेश पाटील यांच्या प्रयत्नातून या बाबत बैठक झाल्यास दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.