इस्त्रोची उपग्रह मोहीम अयशस्वी

श्रीहरीकोटा | वृत्तसंस्था |
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोची उपग्रह प्रक्षेपण मोहीम अयशस्वी ठरली आहे. गुरुवारी पहाटे जीएसएलव्ही- एफ 10 या प्रक्षेपकाने ( रॉकेटने ) नियोजित वेळेनुसार 5 वाजून 43 मिनिटांनी श्रीहरिकोटा इथून ईओएस-03 या कृत्रिम उपग्रहासह अवकाशात झेप घेतली. प्रक्षेपकाचे पहिले दोन टप्पे यशस्वी पार पडले. मोहीम सुरू झाल्यावर साधारण नऊ मिनिटात प्रक्षेपकाने सुमारे 130 किलोमीटर एवढी उंची गाठल्यावर मोहिमेतील महत्त्वाच्या तिसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली. उपग्रहाला आणखी उंचीवर नेणारा क्रायजेनिक इंजिनाचा टप्पा सुरू झाला. पण अवघ्या काही सेकंदातच या इंजिनासह उपग्रह नियोजित मार्ग भरकटत असल्याचे लक्षात आले.
या सर्व उपग्रह मोहिमेचे थेट प्रक्षेपण इस्रोच्या संकेतस्थळावरून आणि इस्रोच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू होते. श्रीहरिकोटा इथल्या मिशन कंट्रोलमधून प्रत्येक सेकंदाबाबत होणार्‍या घडामोडीची माहिती सांगितली जात होती. मात्र मोहिमेच्या तिसर्‍या टप्प्यात गडबड झाल्याचे लक्षात आल्यावर मिशन कंट्रोलमधील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अभियंते यांचे चेहरे चिंतातुर झाले. त्यानंतर दहा मिनिटात या मोहिमेचा आढावा घेत इस्रोचे अध्यक्ष डॉ के सिवन यांनी मोहीम पूर्ण झाली नसल्याचे स्पष्ट केले

Exit mobile version