महाडच्या क्रांती भूमीतून नवोदयाची हाक
| पोलादपूर | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्यामागे संत परंपरेचा विचार आहे, तोच विचार भारताच्या संविधानामध्येदेखील आहे, त्यामुळे जगातील सर्वोत्कृष्ट लोकशाही भारतामध्ये नांदत असताना ज्या क्रांती भूमीतून आपण संविधान अमृत महोत्सवाचा उपक्रम राबवित असलो, तरी अद्याप सर्वत्र मनुस्मृती जिवंत असल्याचा भास होत आहे, असे उद्गार सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी संविधान अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला क्रांतीभूमी येथील प्रमुख भाषणामध्ये व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर कॉम्रेड धनाजी गुरव, क्रांतीसिंह नाना पाटील यांचे चिरंजीव सुभाष पाटील, भारत महाराज कैकाडी, फडतरे महाराज, कैलास देसाई, पनवेल काँग्रेसच्या श्रुती म्हात्रे, जिल्हा काँग्रेस सदस्य धनंजय शिंदे, नागेश जाधव तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
उल्काताई महाजन यांनी भाषणामध्ये पुढे मनुस्मृती दहन 1927 ला झाल्याखेरीज लोकशाही आणि स्वातंत्र्य देशवासियांना मिळणे दुरापास्त असल्याची जाणीव असल्यानेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री आणि शूद्र यांना हिनतेचे जीवन देणाऱ्या मनुस्मृतीचे दहन महाडच्या क्रांतीभूमीत केले. महाडचे तत्कालीन 23 वर्षीय अध्यक्ष सुरबानाना टिपणीस यांनीदेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शहरातील पाणवठे खुले करून देण्यासाठी निमंत्रित केले होते. या क्रांतीभूमीतूनच समतेचा संगर सुरू होऊन देशव्यापी वातावरण निर्माण झाले. आणि, आता संविधान जाळण्यापर्यंत मजल जाऊनही कोणतीही कारवाई होत नाही पुन्हा मनुस्मृती आणण्याची भाषा सुरू झाली आहे. त्यामुळे आता महाडच्या क्रांती भूमीतून तरुणांनी केवळ समतेचाच नव्हे तर, लोकशाही आणि संविधान अबाधित ठेवण्यासाठी आपल्या आयुष्याची अनेक वर्षे सक्रिय ठेवण्याची गरज आहे, असे आवाहन केले.
याप्रसंगी कॉम्रेड धनाजी गुरव यांनी, संत स्वराज्य आणि संविधान हा शिवशंभू प्रतिष्ठानच्या चळवळीचा उद्देश असून, सध्याच्या तरुणांना यापासून दूर करणाऱ्या वाईट शक्तींना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणांना लोकशाही मार्गाकडे ओढण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. मनुस्मृतीने महिला आणि शूद्र यांचे अधिकार डावलून ही समाज व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न केला; ती मनुस्मृती छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी झिडकारली होती. असे सांगून तत्कालीन समाज व्यवस्थेने त्यांना शूद्र म्हणून राज्याभिषेक करण्यास नकार दिला असतानादेखील महाराज सम्राट झाले. त्यांनी रयतेचा राज्य आणले. स्वतःच्या आई जिजाऊ माँसाहेबांना सती जाण्यापासून परावृत्त केले आणि महाराज मोहिमेवर असताना स्वराज्याचा कारभार पाहण्याचे काम राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी केले. यातूनच महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर येथील ताराराणी यांनी प्रेरणा घेतली आणि पेशव्यांना विरोध केला स्वतःचे संस्थान उभे केले. यामागे देशातील संत परंपरा ही प्रोत्साहित करणारी ठरली. आज कुठेतरी जाती आणि धार्मिक वादाच्या आडून संत विचार कुंठीत केले जात आहेत; स्वराज्य देखील धर्म जातीमध्ये अडकविले जात आहे. या सगळ्यातून प्रभावी लोकशाही आणि जगमान्य भारतीय संविधान टिकवण्याची आपणावर जबाबदारी आहे असे सांगून प्रमाणे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आहे त्याप्रमाणे रायगडावर स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराजांचेदेखील स्मारक होण्याची आवश्यकता आहे आणि त्यातूनच भावी पिढीला प्रेरणा मिळणार आहे म्हणून तिच्यावरदेखील घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तरुण, महिला, आबालवृद्धांनी क्रांतीभूमीवर गर्दी केली होती. याप्रसंगी विद्रोही प्रकाशनाची दोन पुस्तके भाई सुभाष पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश जाधव यांनी केले, तर आभार दर्शन प्रा. दीपक क्षीरसागर यांनी केले. प्रारंभी गंगाधर साळवी यांनी संविधान, लोकशाही, संत विचार, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आज्ञापत्र विषयांवर आधारित पोवाडे सादर केले. क्रांतीभूमीवर राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, चवदार तळे तसेच अन्य भागांमध्ये उपस्थितांची पदयात्रा संविधान अमृत महोत्सवाच्या घोषणांनी काढण्यात आली. यानंतर सर्व संविधानप्रेमी पाचाड येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या समाधीस्थळी जाऊन मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहिले.






