‘त्या’ काळरात्रीला झाली ३३ वर्षे

1989 च्या महापुरातील मृतांना वाहिली श्रद्धांजली
| सुधागड-पाली | वार्ताहर |

अंबा नदीला 24 जुलै 1989 च्या पहाटे महापूर आला होता. या महापुराचा फटका सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा गावाला बसला होता. या महापुराला रविवारी (दि.24) 33 वर्षे पूर्ण झाली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील येथील स्मृतिस्तंभाजवळ सर्व ग्रामस्थ व मान्यवरांनी महापुरातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. आणि, त्या दुःखद आठवणींना उजाळा दिला.

यावेळी स्मृतिस्तंभाला फुलांचे हार घालण्यात आले होते. या महापुरात अनेकांनी आपली बायको, मुले, भाऊ, बहिणी, भाचा अशी जिव्हाळ्याची माणसे गमावली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. याबाबत दुःखद आठवणी सांगताना शिक्षक जे.बी. पाटील म्हणाले की, 23 जुलै 1989 ची रात्र जांभुळपाडा गावाच्या दृष्टीने काळरात्र ठरली. सगळीकडे सुन्न आणि भयावह वातावरण होते. दुर्दैवाचे दशावतार आणि आभाळ फाटणे काय असते, याचा खराखुरा प्रत्यय या पुराने आम्हाला दिला, असे जे.बी. पाटील यांनी सांगितले.

पाटील गहिवरुन म्हणाले, त्या काळरात्रीने माझी कारभारीन हिरावून नेली. 23 तारखेला संध्याकाळी मुंबईवरुन बायकोच्या माहेरुन सर्वजण घरी आलो. नदीला तसे पाणी जास्त नव्हते. रात्री अडीच वाजता उठून बघतो तर काय सर्व घरात पाच फूट पाणी. आई, भाची (पाचवीत), मुलगा (अडीच वर्षांचा) आणि बायको सगळे गोंधळून गेलो. बघता-बघता पाणी आठ-नऊ फूट वाढले. बायकोचा हात हातातून निसटाला आणि ती डोळ्यासमोरुन वाहून गेली, मुलगा आणि मी वाहत जात एका झाडाला अडकलो. दुसर्‍या दिवशी गावातील बबन घरत व गावकर्‍यांनी झाडावरुन काढले. आई, भाची आणि बायको गेलेत या विचारातच घराकडे धाव घेतले तर आई आणि भाची स्वयंपाकखोलीच्या ओट्याच्या खिडकीला टांगून राहिल्या म्हणून वाचल्या. पण, कारभारीण मात्र गेली. आणि तिच्याबरोबर पोटातील आठ महिन्यांचे बाळदेखील. सरकार दरबारी मृतांचा आकडा 80 असला तरी वास्तवात शेकडो लोकांना आपला जीव गमवायला लागला. या पुराचा फटका पाली आणि इतर गावांनादेखील बसला होता. यावेळी इतर उपस्थितांनीदेखील आपले अनुभव सांगून माहिती दिली.

यावेळी सरपंच श्रद्धा कानडे, पोलीस उपनिरीक्षक श्री. सरगर, रवींद्र खंडागळे, भास्कर, शेळके, जे.बी. पाटील, रोहित भगत, सहाय्यक फौजदार म्हात्रे, पोलीस नाईक भोईर, पोलीस नाईक गणेश डोंगरे, पोलीस शिपाई रामसेवक कांदे, पोलीस शिपाई अलगर आंबा बहाडकर, जांभुळपाडा मंडळ अधिकारी बुरंबे, ग्रामसेवक सचिन केंद्रे, प्रतिभा कुलकर्णी, नितीन काळे. ज्ञानेश्‍वर कदम, नंदा भगत आदींसह ग्रामस्थांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली.

Exit mobile version