बंडखोर उमेद्वार ठाकरे यांची भूमिका
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत विधानसभा मतदारसंघात किरण ठाकरे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपण आणि आपले कार्यकर्ते महेंद्र थोरवे यांचे प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले आहे.
कर्जत विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेद्वार किरण ठाकरे यांनी कर्जत रॉयल गार्डन येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी किरण ठाकरे यांनी नामांकन अर्ज मागे घेण्याबद्दल खुलासा करताना सांगितले की, आम्ही निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तशी तयारी होती. पक्षाचे राष्ट्रीय नेते नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील सर्व बंडखोर यांची उमेद्वारी मागे घेण्याचे आदेश दिले होते. तसेच, अमित शाह यांचा देखील तसा आदेश असल्यामुळे आज मी अर्ज मागे घेतला असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, शनिवारी (दि.3) झालेल्या बैठकीत आम्ही पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांचा कार्यकर्त्यांचा संभ्रम त्यांच्या कामकाजातून होत असून कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या आहेत. जिल्हा अध्यक्ष हे वेगळ्या प्रकारे काम करीत असून आम्ही आमच्या भावना या मंत्री महोदय यांच्याकडे केली आहे.मी स्वतः देखील रवींद्र चव्हाण यांच्याकडे जिल्हा अध्यक्ष यांच्याबाबत जिल्हा नेतृत्व बदलावे अशी मागणी केली आहे. महायुतीला पाठिंबा देण्याचे पक्षाचे आदेश असून भाजपचे सर्व कार्यकर्ते हे महायुतीचा प्रचार करणार आहेत. मी महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांचे प्रचार करणार नाही तर महायुतीचे काम करणार आहे.आमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याकडून त्रास दिला जात आहे आणि त्यामुळे ते उद्या निवडून आले तरी ते कार्यकर्त्यांचा त्रास कमी होणार नाही.त्यामुळे आम्ही महेंद्र थोरवे विरोध करणार असून महायुतीला मदत करणार आहोत.