पनवेलकरांनो पाणी जपून वापरा; तुमच्या भागात ‘या’ दिवशी पुरवठा बंद

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पावसाळ्यापर्यंत पनवेलकरांना सुरळीत पाणी पुरवठा करता यावा, याकरीता पालिकेमार्फत पाण्याचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी शहरातील जलकुंभाच्या क्षेत्रनिहाय एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. 8 डिसेंबरपासून 15 जूनपर्यंत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती पालिकेने प्रसिद्धीपत्रकातून जाहीर केली आहे.

पनवेलकरांना दररोज 32 दश लक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची गरज लागते. पालिकेच्या मालकीच्या अप्पासाहेब वेदक देहरंग धरणातून पनवेल शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र हा पुरवठा अपुरा असल्यामुळे संपूर्ण पनवेल शहराची पाण्याची गरज भागात नसल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मिळणाऱ्या 11 एमएलडी तसेच एमआईडीसीकडून मिळणाऱ्या 5 एमएलडी पाण्यातून पनवेलकरांची पाण्याची गरज भागवण्याचे काम पालिकेमार्फत केले जाते. एमजेपी आणि एमआयडीसीकडून पनवेलला मिळणाऱ्या पाताळगंगा नदीतून पाणी पुरवठा होत असताना आठवड्याच्या प्रत्येक रविवार व सोमवारी कमी पाणी पुरवठा करण्यात येतो. तसेच इतर वेळेतही विजेच्या तांत्रिक दरुस्तीच्या कामांसाठी व इतर दुरुस्तीच्या कामांसाठी शटडाऊन घेतल्याने वारंवार पनवेलला कमी पाणी पुरवठा होत असल्याने देहरंग धरणातून जास्त पाणी उपसा करुन शहराची तहान भागवावी लागते.

अधिकचा उपसा सध्या केल्यास धरणातील पाणीसाठा उन्हाळ्यात संपून जाईल. या भितीमुळे महापालिकेने धरणातील पाण्याचे नियोजन 8 डिसेंबरपासून केले असून पनवेल शहरामधील 9 विविध उंच जलकुंभ निहाय एका भागात आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे.

असे आहे नियोजन
शुक्रवारी मिडलक्लास सोसायटी, भाग एक व दोन, एस. के. बजाज तसेच शनिवारी तक्का गाव, नागरी वसाहतीमध्ये पाणी पुरवठा बंद राहील. रविवारी संपुर्ण पनवेलकरांना पाणी पुरवठा सूरळीत सूरु राहील. सोमवारी मार्केटयार्ड, भाजी मार्केट, पायोनिअर सोसायटी, ठाणा नाका, पटेलपार्क, जैन मंदीर, गणपती मंदीर, मामलेदार कचेरी, दत्तराज सोसायटी, साठेगल्ली, विरुपाक्ष मंदीर, धूतपापेश्वर कारखाना शहरातील बहुतांश परिसरात पाणी पुरवठा होणार नाही. मंगळवारी पटेलमोहल्ला तर बुधवारी एचओसी कॉलनी परिसर आणि गुरुवारी ठाणा नाका परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

Exit mobile version