| मुंबई | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या शपथविधीनंतर लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी (दि. 15) नागपूर येथे दुपारी 3 वाजता पार पडणार आहे. या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार, कोणाचा पत्त कट होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. चांगले मंत्रिपद पदरात पाडून घेण्यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावल्याची माहिती आहे. त्यामुळे, मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमाला वेग आला असून, मुंबईऐवजी आता नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचं निश्चित झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे 21 मंत्री शपथ घेणार आहेत, तर राष्ट्रवादीचे 10 आणि शिवसेनेच्या 12 मंत्र्यांचा शपथविधी होईल. त्यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे नागपुरात पहिल्यांदाच मंत्र्यांचा शपथविधी होत आहे.





