सावरकरांचा मुद्दा, 70 हजार कोटींच्या घोटाळ्यावरुन ठणकावले
| मुंबई | प्रतिनिधी |
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीमधील मित्रपक्षांमधील कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार हे थेट भाजपच्या रडारवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. एकीकडे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ‘सावरकरांचे विचार मान्य असतील तर सोबत या, नाहीतर तुमच्याशिवाय पुढे जाऊ’, अशा शब्दांत अजित पवारांना ठणकावले आहे. तर, दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा निर्णय अजून होणे बाकी आहे’ असा इशारा देत राजकीय वातावरण तापवले आहे.
या वादाची सुरुवात अजित पवार यांनी पुण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेतून झाली. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवारांनी भाजपच्या काही धोरणांवर आणि स्थानिक नेतृत्वावर बोचरी टीका केली होती. पुण्याच्या विकासकामांच्या श्रेयवादावरून त्यांनी भाजपला लक्ष्य केले होते. अजित पवारांच्या या टीकेला आधी रवींद्र चव्हाण आणि त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले होते. मात्र, आता आशिष शेलार यांनी या वादात थेट सावरकरांचा मुद्दा आणल्याने युतीमधील तणाव वाढला आहे.
अजित पवारांच्या टीकेवर भाष्य करताना आशिष शेलार यांनी आमचा पक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर चालणारा आहे, असं म्हटलं. “रवींद्र चव्हाण म्हणालेच आहेत की आम्ही सावरकरांचे भक्त आहोत. सावरकरी विचारांवर चालणारे लोक आहोत. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षालासुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. याल तर तुमच्याबरोबर, न याल तर तुमच्याविना आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही आमचे काम करु,” असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.
भाजपपाच्या या दोन आघाड्यांवरील वक्तव्यांमुळे महायुतीतील सत्तासमीकरणे अस्वस्थ झाली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची कोंडी करण्याचे भाजपचे नियोजन असल्याची चर्चा सुरु झाली आहे. निवडणुका अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपल्या असताना, मित्रपक्षांमधील हा अंतर्गत संघर्ष विरोधकांसाठी फायद्याचा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
