| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेत महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी पक्ष जी जबाबदारी देईल, ती पार पाडेन, असे शेकाप पुरोगामी युवक आघाडीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले. ते पनवेल येथे शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉ. दत्तात्रय पाटील, राजेश केणी, माधुरी गोसावी, माजी विरोधी पक्षनेते राजप जनार्दन चांगू पाटील, पुरषोत्तम भोईर, नंदकुमार भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब देशमुख पुढे म्हणाले, की माझे मार्गदर्शक गणपतराव देशमुख यांनी महाराष्ट्रात शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार घेऊन सतत काम केले. त्यांचाच वारसा पुढे चालवत असताना, पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून काम करीत आहे. सध्या नागरिक मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात आहेत, त्यांचे प्रश्न सोडवणे, याला प्राधान्य देणे मी महत्त्वाचे समजतो.
यानंतर त्यांनी पनवेल महानगर पालिकेतील कळंबोली विभागातील नगरसेविक गोपाळ भगत आणि नगरसेवक रवींद्र भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयांना भेट दिली. यावेळी अमर बुरंगे, संतोष ठोंबरे, आबासाहेब मेटकरी, गणेश बुरुंगे आदी सांगोला विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते.







