। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाराष्ट्राच्या समाज प्रबोधनाच्या तसेच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी शिंदे या चार समाज क्रांतीकारांना केंद्रस्थानी ठेवावे लागते. सखोल दोन दशकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या नेत्यांनी महाराष्ट्रात समग्र क्रांतीची मूहूर्तमेढ रोवली. त्यांनी मुलगामी परिवर्तनाचा सिध्दांत मांडला. अस्पृश्यतेचे निवारण, शेतकऱ्यांचे कल्याण, बहुजन समाजाला शिक्षण या मुद्द्यावर सामाजिक समतेची चळवळ उभी केली. त्यामागे मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे, गरीबांना उत्तम शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळावी हा उद्देश होता.
शिक्षण व आरक्षण हे शाहू महाराजांचे कार्य होते. संविधानात तरतूदी दिसतात. त्याची पायाभरणी महाराजांनी केली होती. चवदार तळ्याचा सत्याग्रह यशस्वी पार पडला. चरीचा संप पार पाडला. त्यामुळे ब्रिटीश सरकारला कसेल त्याची जमीन हा कायदा अंमलात आणावा लागला. यावेळी बाबासाहेबांनी केलेली मदत कदापी विसरणार नाही, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्याप्रसंगी शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील यांनी केले.
पुढे ते म्हणाले की, भारतीय राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झाली. त्याच घटनेचे सिध्दांत पायदळी तुडविण्याचे काम सरकार करीत आहे. शेकाप हा फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्थापन झाला आहे. शंकरराव मोरे, नारायण पाटील, दाजीबा देसाई, विठोबा हांडे आदींनी शेकापची स्थापना केली. आज आपण शेकापच्या 78 वर्षात पदापर्र्ण करीत आहोत, याचा आनंद आहे. या नेत्यानंतर पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली ती एन.डी पाटील, गणपतराव देशमुख, प्रभाकर पाटील, दत्ता पाटील यांनी. तोच वारसा समर्थपणे सांभाळण्याचे काम शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. विचाराने एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता कुठेही सोडून गेला नाही. आगामी काळात समतावादी विचार प्रवाहाची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी जयंत पाटील यांच्या पाठीशी कार्यकर्त समर्थपणे उभे आहेत, असे प्रतिपादन शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील यांनी केले.







