अनंत गीतेंना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा
। रायगड। खास प्रतिनिधी ।
मुस्लिम समाजाने नेहमीच शेकापला साथ दिली आहे. आताच्या निवडणुकीत सुनील तटकरेंचा नायनाट करण्याची ताकद ही मुस्लिम समाजामध्येच आहे. इंडिया आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना मोठ्या संख्येने मतदान करुन निवडून आणावे, असे आवाहन शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.
रायगड जिल्ह्यात शेकापची प्रचंड ताकद आहे. त्यामुळे राज्यात सर्वाधिक मताने विजयी उमेदवार म्हणून निवडून येणारे जायंट किलर ठरणार आहेत. आमची सभा असल्याचा धसका त्यांनी घेतला आहे. यासाठीच त्यांनी याच ठिकाणी सभा लावली आहे. हिम्मत असेल तर आमच्या व्यासपीठावर या आणि मुस्लिम समाजासाठी कोणी किती काम केले हे सांगा, असे आवाहनही आमदार जयंत पाटील यांनी केले. सुनील तटकरे, अजित पवार यांना शरद पवार यांनीच मोठे केले आहे. त्यांनीच आता गद्दारी केली आहे. तटकरेंनी जिल्ह्यातील नव्हे, तर राज्यातील बहुतांश जणांना फसवले आहे. मात्र, या निवडणुकीत त्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी केला असल्याचे आमदार पाटील म्हणाले. तटकरेंना पैसा आणि सत्तेची मस्ती आली आहे. त्यांची मस्ती मतदार उतरवल्याशिवाय राहणार नाहीत. तटकरेंना मोठे करण्याचे पाप जसे पवारांचे आहे, तसेच त्यांचे मोठे बंधू अनिल तटकरेंचे आहे. त्याच भावाला सुनील तटकरे यांनी फसवले आहे. आता बदला घेण्याची वेळ आली आहे, असे आमदार पाटील म्हणाले. आपली सत्ता आल्यावर ते तुमच्या पायाशी येतील, त्यांना थारा देऊ नका, असे पाटील यांनी शरद पवार यांना सांगितले.
भूमिका आणि तत्त्व जपणारा माणूस म्हणजे शरद पवार आहेत. त्यांच्याइतके काम आम्ही करु शकत नाही. मात्र, त्यांच्याकडे बघून आमच्या दंडात बळ येते, असेही ते म्हणाले. तटकरेंसह भरत गोगावले यांनीदेखील गद्दारी केली आहे. जिल्ह्यात ज्यांनी-ज्यांनी गद्दारी केली त्यांना धडा शिकवायचा आहे. जेणे करुन पुन्हा कोणी गद्दारी करण्याची हिम्मत करणार नाही, असे आवाहन त्यांनी केले. देशभरात भाजपाच्या मोंदींनी विश्वास गमावलेला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचाच बोलबाला असल्याने केंद्रात आपलीच सत्ता येणार असून, राहुल गांधी हेच प्रधानमंत्री होतील, असे भाकितही आमदार पाटील यांनी केले.
देशाचे कृषीमंत्री म्हणून शरद पवार यांनी केलेल्या कामाची सर कोणालाच येणार नाही. त्यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे देश शेतीमध्ये आत्मनिर्भर झाल्याचे पाटील यांनी सांगितले.
भाजप हटाव, संविधान बचाव: उल्का महाजन
रायगडची भूमी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी ओळखली जाते. रायगडात होत असलेली आजची सभा महत्त्वाची आहे. भाजपला हटविण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. लोकशाही वाचवायची असेल, संविधान टिकवायचे असेल, तर भाजपला सत्तेतून हटविणे गरजेचे आहे, असा निर्धार आम्ही सर्वहारा जनआंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी केला.
भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी देशातील सर्वच मतदारसंघातील जनता एकवटल्याचे चित्र असून, रायगड मतदारसंघही त्यापैकी एक. भाजपकडून ज्यापप्राकरे द्वेषाचे राजकारण सुरू आहे, ते संपविण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दूरदृष्टी, निष्ठा, अथक परिश्रमातून संविधानची निर्मिती केली, आधुनिक भारताचा रोड मॅप तयार केला. तेच संविधान आज भाजप संपवायला निघाली आहे, असा आरोपही उल्का महाजन यांनी केला. देशात वाढत असलेली महागाई,वाढती बेरोजगारी, उपासमार हीच का, मोदींची गॅरंटी असा सवालही त्यांनी केला. त्या म्हणाल्या आम्ही नेत्यांना स्पष्ट सांगतो की, निवडणुकीच्या राजकारणात मदत मागण्यासाठी येणाऱ्यांचे हात पसरलेले असतात. पण, आम्ही सर्व जनसंघटना असे म्हणतो, की आमचा हात पसरलेला नाही. आम्ही यांना काही हातभार लावयला आलेलो आहोत. योगदान द्यायला आलो असून, याबद्दल आमची कोणतही अपेक्षा नाही. हे निर्विवादपणे आम्ही आमच्या खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत. इंडिया आघाडीच्या उमेदवारांचं निर्विवाद समर्थन आणि भाजपच्या उमेदवाराचा पाडाव, यासाठी महाराष्ट्रातल्या जनसंघटना कामाला लागल्या आहेत. भाजपकडून फुकट रेवडीवाटपाचे जे धोरण सुरू आहे, त्याची पोलखोल करण्याची गरज आहे. 80 कोटी लोकांना मोफत रेशन वाटपाचा दावा मोदी करत असून, तो आकडा आला कुठून, असा प्रश्नही महाजन यांनी केला.
भाजपकडून निवडणुकीत आमिष दाखविण्याचं काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणजे रेशन दुकानांवर मोफत साडी वाटप सुरू आहे. आम्ही या रायगड आणि पालघर जिल्ह्यात आदिवासी आणि मच्छिमार महिलांचे मेळावे घेतले, सावित्रीबाईंचा स्मृतिदिन साजरा केला, त्यात आम्ही आवाहन केले, की जे सरकार मणूिपरमधल्या आपल्या आदिवासी भगिनींची विटंबणा रोखू शकत नाही, त्यांच्यावरचे बलात्कार रोखू शकत नाही, त्यांना संरक्षण देऊ शकत नाही, त्या सरकारकडून आपण फुकट साडी घेणार का, त्यावेळी या महिलांनी एकच आवाज दिला, की आम्ही या सरकारच्या फुकटच्या साड्या घेणार नाही. शेतकरी, मच्छिमार विशेषतः आदिवासी महिलांनी मोर्चाने जाऊन त्या साड्या परत केल्या, हा आहे स्वाभिमान, असेही त्या म्हणाल्या. सरकारच्या कोणत्याही आमिषाला न भुलणारे शेतकरी बांधव, मच्छिमार महिला, शहीनबागमध्ये पहिल्या आवाज उठविणाऱ्या मुस्लीम भगिनी, आदिवासी महिला या सर्वांच्या पाठीचे कणे ताठ आहेत. त्यांच्यावर ईडीची तलवार टांगा, सीबीआय, इन्कमटॅक्सवाले मागे लावा किंवा एटीएसवाले मागे लावा, काहीही लावलं तरी, पाठीचे कणे झुकणार नाहीत. आणि, हाच महाराष्ट्राचा पाया आहे. तेव्हा या महाराष्ट्राच्या पायावर आपण एल्गार केला पाहिजे की, आता उषःकाल होता होता काळ रात्री झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. आणि तीच मशाल शिवसेनेला मिळाली आहे. ती मशाल घेऊन अनंत गीतसाहेब निघाले आहेत. इंडिया आघाडीचे सर्व नेते बरोबर आहेत. एका बाजूला हात आहे आणि त्याच हातात तुतारी आहे, मशाल आहे. तेव्हा हात, मशाल, तुतारी घेऊन निघालेले, काळ रात्र संपवायला निघालेली इंडिया आघाडी यांना समर्थन द्यावे, अनंत गीतेंना पाठिंबा देत मनापासून शुभेच्छा देऊया की विजय तुमचाच आहे. आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत.
शेतकरी नष्ट करण्याचा भाजपचा घाट आगामी लोकसभा निवडणूक ही खऱ्या अर्थाने ऐतिहासिक असणार आहे. ही निवडणूक स्वाभिमानाची आहे. 2014 पासून भाजपचे सरकार आले. दहा वर्षांत या सरकारने जाती-जातीत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. समाजात वाद निर्माण केला जात आहे. अघोषित हुकूमशाही लादली जात आहे. लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधात बोलणाऱ्याच्या विरोधात ईडीसह अनेक सुरक्षा यंत्रणेचा वापर केला जात आहे. शेतकऱ्यांना नेस्तनाबूत करण्याचा घाट घातला जात आहे. मात्र, काँग्रेसच्या काळात शैक्षणिक, आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध केल्या होत्या. काँग्रेस सरकारच्या काळात रोजगाराचे साधन खुले केले आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे विलास सुर्वे यांनी केले आहे.