विद्यार्थ्यांना सम्यक दृष्टी देणे पालकांची जबाबदारी

वासंतीताई उमरोटकर यांचे प्रतिपादन

| आगरदांडा | प्रतिनिधी |

जीवनात यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी अथक परिश्रमाने अभ्यास करुन यश प्राप्त करावे व गुणवत्तेची कास धरावी, जेणेकरून जीवनात आपल्याला उचित ध्येय गाठता येते. शालेय जीवनात अभ्यासाकडे सर्वाधिक लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी उत्तम नियोजन आणि अभ्यासातील सातत्य महत्त्वाचे आहे. मोबाईलमध्ये सतत न राहता जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षांकडे लक्ष केंद्रित करण्याकरिता विद्यार्थ्यांना सम्यक दृष्टी देणे ही पालकांची जबाबदारी आहे, तरच विद्यार्थ्यांना यश प्राप्त करता येईल, असे प्रतिपादन मुरुड दैवज्ञ ब्राह्मण महिला समाज अध्यक्ष वासंती उमरोटकर यांनी केले. रायगड दैवज्ञ समाज संस्था आयोजित विद्यार्थ्यांचा गुणगौरव, ज्येष्ठ श्रेष्ठ समाज बांधव सत्कार समारंभ कुणबीभवन येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी वैभव खेडेकर, अपेक्षा कारेकर, प्रवीण पिसाट, संस्थापक डॉ. नंदकुमार राजपूरकर, सचिव सूर्यकांत विरकर, राजेंद्र दांडेकर, उदय म्हशेळकर, महेश वेदपाठक, किशोर वेदक, सुहास वेदक, प्रकाश उमरोटकर, संजय पोतदार, ओमकार पोतदार, जयेश चोडणेकर, दीपक राजपूरकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात श्रीगणेशाच्या व नामदार कै. नाना शंकरशेट यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. दक्षिण रायगड दैवज्ञ समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ज्येष्ठ बांधवांचा शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. महिलांच्या आयोजित कार्यक्रमात पैठणीचा मान नमिता प्रविण वीरकर यांना मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मितल वावेकर, स्नेहा विरकरसह सुहास वावेकर यांनी केले.

Exit mobile version