निवृत्त न्यायाधीश श्रीकांत उपाध्ये यांचे प्रतिपादन
फिरते लोकन्यायालयात कायदेविषयक मार्गदर्शन
| नागोठणे । वार्ताहर ।
आपल्या ग्रामपंचायत मधील, आपल्या गावातील नागरिकांना एकवेळचे जेवण मिळाले नाही तरी चालेल पण आपले नागरिक, ग्रामस्थ आनंदाने, सुखाने कोणताही तंटा न करता जीवन जगले पाहिजेत. पोलीस ठाणे व त्यानंतर न्यायालय हे अंतिम ठिकाण आहे. त्यापूर्वी आपण कायदा काय सांगतो याचा अभ्यास करा. त्यासाठी आता मराठीतही उपलब्ध झालेल्या कायद्यांच्या पुस्तकांचा आधार घ्या व आपली प्रकरणे सामंजस्याने मिटवा. कारण त्यामध्येच शहाणपण आहे असा मोलाचा सल्ला सेवानिवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत उपाध्ये यांनी दिला.
नागोठणे ग्रामपंचायतीच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्रामसचिवालयाच्या सभागृहात सोमवारी(दि.13) घेण्यात आलेल्या मोबाईल फिरते लोकन्यायालयात उपस्थित नागरिक व पक्षकारांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी नागोठण्याचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, अॅड. मीरा पाटील, पोलीस उपनिरिक्षक नारायण चव्हाण, ग्रामविस्तार अधिकारी एस.एन. गायकवाड, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर, अॅड. महेश पवार, राजेश पिंपळे, पोलिस हे.कॉ. विनोद पाटील, सत्यवान पिंगळे, रोहा न्यायालयातील कनिष्ठ लिपिक गौरव बुरांबे, कनिष्ठ लिपिक शैलेश यादव, शिपाई सागर पाष्टे आदींसह पक्षकार व नागरिक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. या लोकन्यायालयात 18 फौजदारी व 10 दिवाणी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.
यावेळी अॅड. मीरा पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांविषयक कायदे, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारे कायदे तसेच इतर अनेक कायद्यांविषयी व शासनाच्या योजनांविषयी मार्गदर्शन केले. अॅड. मिरा पाटील म्हणाल्या की, काही वेळा महिला याच महिलांसाठी त्रासदायक ठरत असल्याचे दिसून येते. त्यामुळे महिलांनी महिलांसाठी काम केले नाही तर अत्याचार होतच राहणार असल्याने महिलांनी अत्याचारविरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगून आपले आयुष्य हे खूप मौल्यवान असल्याने त्यातील अर्धे आयुष्य न्यायालयात घालविले नाही तर आपले आयुष्य अधिकच सुखकर होईल असा मौलिक सल्लाही अॅड. पाटील यांनी दिला. तर नागोठण्याचे पोलिस उपनिरिक्षक नारायण चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करतांना घाई करु नका, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करतांना विचार करा असा सल्ला यांनी दिला.
दरम्यान नागोठण्यातील फिरते लोकन्यायालयाच्या निमित्ताने या मोबाईल फिरते न्यायालयाच्या व्हॅनचे उद्घाटन रोहा येथील कनिष्ठ स्तर दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या आवारात 13 मार्चलाच सकाळी करण्यात आले. यावेळी निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्रीकांत उपाध्ये, रोहा न्यायालयातील न्यायाधीश एस.एस.महाले, सह न्यायाधीश एम.सी. हासगे, सहाय्यक अधिक्षक आरती चव्हाण व कर्मचारी उपस्थित होते.
सामंजस्याने प्रकरण मिटविण्यातच शहाणपण
