पनवेल, उरणमध्ये पावसाची हजेरी; रस्त्यांवर पाण्याचे लोट
| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात पावसाने झाली. पनवेल आणि उरणमध्ये गुरुवारी (दि.1) पहाटे पावसाने हजेरी लावली. हवेत गारठा वाढलेला असतानाच अचानक आलेल्या पावसाने नववर्षानिमित्त फिरायला आणि कामासाठी घराबाहेर पडलेल्या रायगडकरांची तारांबळ उडाली.
दिवसभरात पुन्हा पाऊस आलाच तर बचाव व्हावा, यासाठी अनेकांनी घराबाहेर पडताना छत्री, रेनकोटही सोबत घेतला. हवामान केंद्राच्या कुलाबा केंद्रात 9.2 मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात 6.7 मिमी पावसाची नोंद झाली. रायगडात डिसेंबर महिन्यापासून किमान तापमानात घट झाली होती. हवेतील गारठा कायम असतानाच गुरुवारी पहाटे 5 च्या सुमारास पनवेल आणि उरणमध्ये पावसाने हजेरी लावली.
छत्रपती शिवाजी महाराज स्थानक परिसर, गिरगाव, ग्रॅन्ट रोड, लालबाग, दादर, घाटकोपर, बोरिवली, मुलुंड आणि आसपासच्या परिसरात पाऊस पडला. तसेच पालघर आणि उत्तर कोकणातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, मुंबई आणि उपनगरांमध्ये शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पावसामुळे काही भागातील सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे रायगड जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात किमान तापमानात चढ-उतार होत होता. गुरुवारी झालेल्या पावसामुळे हवेतील गारव्यात आणखी वाढ झाली. थंड वारे आणि ढगाळ वातावरणामुळे रायगड जिल्ह्यातील किमान तापमानातही घट झाली. हवामान केंद्राच्या सांताक्रूझ केंद्रात 19.5 अंश सेल्सिअस, तर कुलाबा केंद्रात 19.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसात शहरातील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवेच्या गुणवत्तेत सुधारणा
मुंबईत पहाटे पडलेल्या पावसामुळे हवा प्रदूषणात काही प्रमाणात सुधारणा झाली. पावसामुळे हवेतील प्रदूषके, सूक्ष्म कण स्वच्छ होण्यास मदत होते. मागील दोन महिन्यांपासून मुंबईतील हवा प्रदूषणात सातत्याने वाढ होत होती. यामुळे शहरवासियांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पडलेल्या पावसाने हवा प्रदूषणात काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे.
