श्रावणात घननिळा बरसला

मुरुड कोमसापतर्फे श्रावणसरी मैफिल रंगली

। मुरूड । वार्ताहर ।

कधी उन तर कधी पाऊस,हिरवीगार झालेली सृष्टी अशा आल्हाददायक वातावरणात मुरुडमध्ये श्रावणातील घननिळा बरसला आणि उपस्थितांची मने जिंकून गेला.निमित्त होते कोमसापच्या श्रावणसरी कार्यक्रमाचे.

मुरुडच्या मुख्याधिकारी दीपाली दिवेकर यांच्या निवासस्थानी श्रावणमासाचे औचित्य साधून श्रावणसरी ह्या साहित्यिक मैफिलीचे आयोजन कोमसापतर्फे करण्यात आले होते.

श्रावणसरी मैफिलीची सुरुवात अध्यक्ष संजय गुंजाळ, कार्याध्यक्ष अरुण बागडे, ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ. रवींद्र नामजोशी, दीपाली दिवेकर यांच्या मातोश्री हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पुजनाने करण्यात आली. दिवेकर कुटुंबियांतर्फे दर्जेदार पुस्तके देऊन उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व सदस्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर श्रावणातील आठवणी कथन, काव्यवाचन, काव्यगायन, गप्पा, गाणी अशा मुक्त मैफिलीला सुरुवात झाली.

सर्व उपस्थितांनी ईशास्तवन सामुहिकरित्या सादर केले. त्यानंतर अरुण बागडे यांनी श्रावणात घननिळा या सुमधुर गीत सादर करीत कार्यक्रमाचा दणक्यात प्रारंभ केला. शास्त्रीय मैफिलीची सुरेल सुरुवात जेष्ठ शास्त्रीय गायक डॉ.रवींद्र नामजोशी यांनी पावसावरील सुमधुर गीताने केली. हाच शास्त्रीय संगीताचा माहोल शास्त्रीय संगीत गायिका प्रतिभा मोहिले यांनी एक गीत सादर करत पुढे नेला.

काव्य मैफिलीत संजय गुंजाळ, आशिष पाटील, उषा खोत, वासंती उमरोटकर, वैशाली कासार, प्राची दिवेकर, दीपाली दिवेकर, सिद्धेश लखमदे, उर्मिला नामजोशी यांनी श्रावण व पावसावरील कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. मैफिलीसाठी मुरुडमधील प्रसिद्ध रांगोळीकार, चित्रकार महेंद्र पाटील सर यांनी प्रभावी सुलेखन कसे करावे याचे थोडक्यात मार्गदर्शन केले तसेच त्यांनी केलेल्या सुलेखनाचे काही नमुनेही दाखवले. मैफिलीचे सूत्रसंचालन उर्मिला नामजोशी यांनी तर उपाध्यक्षा उषा खोत मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Exit mobile version