। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. येथील दुर्गम, डोंगराळ, जंगल भागासह दर्याखोर्यात मोठ्या प्रमाणावर गावठी दारुची अवैधरित्या निर्मिती व विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. येथील डोंगराळ व वनाच्छादित प्रदेशाने वेढलेल्या परळी, जांभुळपाडा विभाग तसेच तालुक्याच्या इतर आदिवासी वाडीतील परिसरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गावठी हातभट्टी दारूचा व्यवसाय चालतो. आश्चर्य म्हणजे, पोलीस ठाण्याच्या हद्दीत काहीशा अंतरावर गावठी दारू विक्रीचा राजरोसपणे अवैध धंदा सुरू असल्याचे दिसते. मात्र, पोलिसांकडून कारवाईस दिरंगाई का होते? हा प्रश्न जनमानसातून उपस्थित होतोय. हीच परिस्थिती तालुक्यातील पेंढरमाळ, वावे (माणगाव बुद्रुक) दर्या गाव ठाकूरवाडी, हातोंड विभागातील कसईशेत व अन्य ठिकाणीदेखील दिसून येतेय.
छुप्या मार्गाने गावठी दारू विक्रीचा सपाटा सुरू आहे. सणासुदीच्या दिवसात वाद विवाद व हाणामारीची प्रकरणे वाढण्यास दारूचे अड्डे कारणीभूत ठरणारे आहेत. मात्र, अशा अवैधरित्या चालणार्या धंद्याना लगाम कधी बसणार? याबाबत स्थानिक सरपंच असो अथवा पोलीस पाटील गावाच्या हिताच्या दृष्टीने बेधडक पावले उचलतील अशी अपेक्षा व्यक्त होतेय.
दारूच्या व्यसनाच्या आधीन जाऊन येथील पिढ्यानपिढ्या बरबाद झाल्या आहेत. तरुण देखील व्यसनाधीन होऊन जीवन उध्वस्त करून घेत आहेत. तर घरातील कर्ता कमावता पुरुष दारूच्या आहारी जाऊन मृत्युमुखी पडून संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडत आहे. गावठी दारूच्या आहारी जाऊन आदिवासी तरुण देशोधडीला लागत आहेत, कुटुंबाकडे दुर्लक्ष करीत आहेत. या बाबीकडे तालुका प्रशासन व पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे व आदिवासी वाड्यापाड्यात व्यसनमुक्ती, लोकशिक्षणाची चळवळ, जनजागृती व प्रबोधनपर कार्यक्रम राबवावेत, अशी मागणी जन मानसातून जोर धरत आहे.