प्रत्येक जिल्ह्यात कुणबी नोंद शोधा असं ठरलं नव्हतं-भुजबळ

| पुणे | प्रतिनिधी |
मराठवाड्यातील कुणबी नोंदी सापडण्यासाठी शिंदे समिती स्थापन करण्यात आली होती. त्यासाठी आमचा विरोध नव्हता. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कुणबी नोंद शोधा, असे आम्ही सांगितले नव्हते. शिंदे समितीचे काम संपल्याने समिती आता बरखास्त करा, असा पुनरुच्चार मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. आम्ही मराठ्यांची मागणी कधीच मान्य करणार नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. मराठा समाज हा ओबीसीत बसत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. संविधानामध्ये एक विशेष तरतूद आहे.

गरज असेल तर राज्य सरकार एखाद्या विशिष्ट परिस्थितीत आरक्षण देऊ शकते. त्यानुसार मराठ्यांनी आरक्षण घ्यावे, मात्र, त्यांना ते नको आहे. त्यांना कुणबी प्रमाणपत्र हवे आहे. त्यांची ही मागणी अत्यंत चुकीची असून सर्वोच्य न्यायालयाचा देखील अवमान होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

संभाजी राजांसाठी राज्यातील सर्व समाजातील लोक हे एकच आहेत. त्यांनी सर्व समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी केली. वंचितचे प्रकाश आंबेडकर यांना हात जोडून विनंती आहे, की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे, असेही भुजबळ म्हणाले.

Exit mobile version