| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर मार्गावर असलेल्या सायगावमध्ये पोटच्या मुलानेच आपल्या आईची निघृर्ण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपी इतक्यावच थांबला नाही तर, त्याने आपल्या वडिलांच्या डोक्यात देखील आघात करुन त्यांना जखमी केले. याप्रकरणी आरोपी राजेश रमेश शिर्के (वय 32) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रमेश गोविंद शिर्के (वय 65, रा. सायगाव) यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेशने आपल्या आईच्या डोक्यावर, तोंडावर व पायावर पलंगाच्या फळीने फटके मारून तिची हत्या केली असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
मृत महिलेचे नाव रेखा रमेश शिर्के (वय 53) असे आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी पी. आर. स्वामी व सहाय्यक पोलिस निरीक्षक पी.एम. चौधरी यांनी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आर.सी. कदम हे करीत आहेत.