वाचन संस्कृती वाढण्यास होणार मदत

सार्वजनिक वाचनालय आणि जिल्हा ग्रंथालयाचा स्पूत्य उपक्रम

| अलिबाग | प्रतिनिधी |

लहानांपासून मोठ्यांपर्यंत दिवसेंदिवस कमी होणारी वाचनाची सवय विद्यार्थी दशेपासूनच पुन्हा वाढवी यासाठी अलिबाग येथील सार्वजनिक वाचनालय आणि जिल्हा ग्रंथालयाच्या माध्यमातून चला ग्रंथालय सहलीला हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना ग्रंथालयात बोलावून त्यांना ग्रंथालयातील पुस्तकांची तेथील ग्रंथ संपदेची माहिती करुन दिली जाते.

सार्वजनिक वाचनालय आणि जिल्हा ग्रंथालयाच्या कार्याध्यक्षा शैला पाटील यांनी ही संकल्पना मांडली असून अलिबाग तालुक्यात यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी ज्या प्रमाणे विद्यार्थी जसे सहलीला येऊन त्या वास्तुचे महत्व लक्षात घेतात, त्याच प्रमाणे ग्रंथालय सहलीला आलेले विद्यार्थी ग्रंथ संपदा, पुस्तकांमधील ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहुन वाचनालयातील कर्मचाऱ्यांमध्येही उत्साह वाढला आहे. येणाऱ्या वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थांचे स्वागत करतात, त्यांना वाचनासाठी बसण्याची व्यवस्था करतात. यातून या विद्यार्थ्यांना वाचनालयामधील कपाटांमध्ये ठेवलेल्या विविध विषयांची पुस्तके हाताळण्याची संधी मिळत आहे.

विद्यार्थांनी मागणी केलेले पुस्तक वाचनालयाचे अमित धुमाळ, अंकित म्हात्रे, अर्चना माळवी, सुरेश काटे हे कर्मचारी तत्परतेने काढून देतात. ग्रंथालय सहलीमुळे वाचनालयात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा वावर वाढू लागला आहे, यातून उद्याची संस्कारी, सुशिक्षित पिढी तयार होईल, असा विश्वास सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, कार्याध्यक्षा शैला पाटील यांनी व्यक्त केला.

Exit mobile version