जे. एस. एम. महाविद्यालयामध्ये 75 कोटी सूर्यनमस्कार संकल्प

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

राष्ट्रीय सेवा योजना विभाग जे. एस. एम. कॉलेज, अलिबाग व भारत स्वाभिमान न्यास, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 12 जानेवारी 2022 रोजी राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून मायक्रोसॉफ्ट टीम्स ऍपच्या माध्यमातून 75 कोटी सूर्यनमस्कार संकल्प कार्यक्रम आयोजित केला.

भारतातील योगासनाचा खेळ म्हणून प्रसार करणे आणि आपल्या देशातील तरुणांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त म्हणजेच अमृत मोहत्सव वर्षानिमित्त नॅशनल योगासन स्पोर्ट्स फेडरेशन (NYSF) व इतर चार संस्थानी 30 राज्यांमध्ये 750 दशलक्ष म्हणजेच 75 कोटी सूर्यनमस्कार करण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमात आमच्या महाविद्यालयाने सहभाग घेतला आहे, यामध्ये www.75surynamaskar.com या वेबसाईटवर महाविद्यालयाचे रेजिस्ट्रेशन केले असून महाविद्यालयच्या एकूण 1933 विद्यार्थी व 31 शिक्षक यांनी सहभाग घेतला आहे. या उपक्रमांतर्गत दि.12/01/2022 ते 7/02/2022 या कालावधीत पुढील 21 दिवस रोज किमान 13 सूर्यनमस्कार करण्याचे आवाहन सर्वाना केले आहे.
या उपक्रमाचाच एक भाग म्हणून स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयात 75 कोटी सूर्यनमस्कार उपक्रमाचा उदघाटन कार्यक्रम आज दि.12 जानेवारी 2022 रोजी सकाळी 8:30 वा. आयोजित केला.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला व दैनंदिन जीवनात निरोगी आयष्यासाठी सर्वांनी रोज सूर्यनमस्कार करावेत असे आवाहन केले. त्यानंतर भारत स्वाभिमान न्यास रायगड विभागाचे प्रभारी श्री दिलीप गाटे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सूर्यनमस्कार करण्याचे फायदे, सूर्यनमस्कार योग्य पद्धतीने कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्राणायाम करण्याचे महत्व विशद केले. त्यानंतर त्यांनी सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक दाखवले. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी सदर उपक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रविण गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. ईश्वरदास कोकणे यांनी केले. कार्यक्रसाठी युवा भारत रायगड विभागाचे प्रभारी दीपक गाटे तसेच महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मोहसीन खान, डॉ. प्रेम आचार्य, डॉ. मीनल पाटील, डॉ सुनील आनंद, बी. आर. गुरव व इतर प्राध्यापक, शिक्षक, आणि एकूण 111 विद्यार्थी व स्वयंसेवक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय कॅडेट्स कोर, सांस्कृतिक विभाग आणि सिनिअर व जुनिअर जिमखाना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

Exit mobile version