| पाली/वाघोशी | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील जाधववाडी ते मुळशी गावाला जोडणारा जिल्हा परिषदेच्या मालकीचा मुख्य रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून, नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे या रस्त्यावरील मोरी कोसळून मोठे खड्डे तयार झाले आहेत. परिणामी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गासह वाहनचालकांना प्रचंड कसरत करावी लागत आहे.
या रस्त्यावरून दररोज शाळकरी मुले, शेतकरी, तसेच कामानिमित्त जाणारे नागरिक प्रवास करतात. खड्डे व मोरी कोसळल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून, कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडू शकतो, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. पावसाळ्यात हा मार्ग चिखलमय होत असल्याने दोन चाकी वाहनांचे संतुलन बिघडून घसरण्याच्या घटना घडत आहेत. तर चारचाकी वाहनांना मोठ्या खड्ड्यांतून मार्ग काढताना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
कळंब ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या या रस्त्याची दुरवस्था गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. याबाबत ग्रामस्थांकडून वारंवार संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले. मात्र, अद्याप काहीही हालचाल झालेली नाही. जिल्हा परिषद प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून, प्रत्यक्षात रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. जर संबंधित विभागाने तात्काळ रस्ता व मोरीची दुरुस्ती केली नाही तर लवकरच आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.







