आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून यात्रा
| तुर्भे | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची जनभावना आहे. त्यामुळे नवरात्रीचे औचित्य साधून आगरी-कोळी युथ फाउंडेशनने नवी मुंबईतील 29 गावांतील नवरात्रोत्सवांना भेटी देताना जागर करण्याचा संकल्प आखला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी अटीतटीचा संघर्ष सुरू आहे. विमानतळाचे उद्घाटन कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असताना केंद्राकडून मात्र दिबांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर केलेला नाही. त्यामुळे दिबांच्या नावासाठी केंद्र सरकारला भाग पाडण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. याच अनुषंगाने मोर्चा काढण्यात येणार असून, जनजागृतीसाठी नवी मुंबई पालिका क्षेत्रातील गावांमध्ये नवरात्रोत्सवांना आगरी-कोळी युथ फाउंडेशनकडून भेटी दिल्या जात आहेत.







