रायगडात मराठी भाषेचा जागर


कवी कुसुमाग्रज जयंती साजरी

। तळा । वार्ताहर।

तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ, द.ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय येथे मराठी विभाग व आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने (दि.27) मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. नानासाहेब यादव यांनी केले. प्रभारी प्राचार्य डॉ.भगवान लोखंडे यांनी मराठी भाषा, मराठी भाषा दिवसाचे महत्त्व सांगून मराठी भाषेला अभिजात दर्जा लवकरच भेटेल असा विश्‍वास व्यक्त केला.

यावेळी तृतीय वर्ष कला मराठी विषयाच्या विद्यार्थांनी भित्तीपत्रक प्रकाशित केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. तृप्ती थोरात यांनी केले तर आभार डॉ. राजाराम थोरात यांनी मानले. या कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तळा कोमसापचा उत्सव

| तळा । वार्ताहर ।

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा तळातर्फे स्वा.सावरकर स्मृतिदिन व कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंतीनिमित्ताने व मराठी भाषा गौरव दिन रविवार (दि.26) नाळ मराठी मातीशी हा साहित्यिक कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास पुरुषोत्तम मुळे, संजय गुंजाळ, अ. वि. जंगम, सुखद राणे, संध्या दिवाकर, हेमंत बारटक्के, सिध्देश लखमदे आदि उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांचे हस्ते महाकवी स्वा.सावरकर व कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन तसेच सरस्वतीपूजन व ग्रंथपूजन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.


तळा शाखा अध्यक्ष हेमंत बारटक्के यांनी प्रास्ताविकात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विचार मांडून शाखेच्या उपक्रमांचा उहापोह केला. यावेळी कविता, गझला, अभिवाचन सादर केले. कार्यक्रमाचे निवेदन रणजित गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास तीस कवी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हेमंत बारटक्के, भरत जोशी, उल्का माडेकर, श्रेयश रोडे, शिल्पा मोहिते, परमानंद कजबजे यांनी परिश्रम घेतले.

रातवड विद्यालयात विद्यार्थ्यांची वेशभूषा

| माणगाव । वार्ताहर ।

विद्यामंदिर रातवड विद्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृतिदिन व राजभाषा मराठी दिन सोमवार (दि.27) साजरा करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक महादेव जाधव यांच्या हस्ते स्वा. सावरकर व वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गौरव गीते सादर करुन मराठी भाषेतील साहित्य व परंपरा यांचे सादरीकरण केलें. विद्यार्थ्यांनी वेशभूषा सादरीकरण करून मराठी साहित्यातील विविध नामवंत लेखक, कवी यांची माहिती व जीवन परिचय करून दिला. यावेळी नृत्य, नाट्य, कविता व साहित्यिक चरीत्रातून राजभाषा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मानसी सुतार हिने केले, तर प्रास्ताविक कस्तुरी देवकर हिने केले.

मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे

| कोर्लई । वार्ताहर ।

आज मराठी भाषा दुबळी पडत चालली आहे, अशी काहींची ओरड चालू आहे. परंतु वारक-यांचा ज्ञानोबा तुकोबा हा घोष जो पर्यंत चालू आहे तोपर्यंत ही मराठी जिवंत राहणार आहे. त्यासाठी प्रत्येकाचे मराठीवर प्रेम आणि योगदान आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रा.एल.बी.पाटील यांनी मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले. यावेळी सुभाष महाडिक, वासंती उमरोटकर, संजय गुंजाळ, उषा खोत, सिद्धेश लखमदे, प्राचार्य डॉ. एम. ए. नगरबावडी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयात घेण्यात आलेल्या काव्य स्पर्धेत दिक्षा गायकर, अनिश पाटील, गौरी विरकुड तर निबंध स्पर्धेत वैष्णवी राजपूरकर, स्नेहल गायकर, साक्षी नांदीवकर, गौरी भोस्तेकर यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. डॉ. एस. एस. भैरगुंडे, सुत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष म्हात्रे यांनी तर प्रा. डॉ. मुरलीधर गायकवाड यांनी आभार मानले.

Exit mobile version