ऑनलाईन वीजबिल भरणा गो-ग्रीन योजनेचा जागर

| कल्याण/वसई | वार्ताहर |

महावितरणच्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा सुरक्षित व सुलभ असून अधिकाधिक ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेऊन वेळ व श्रमाची बचत करावी. तसेच पर्यावरणपूरक गो-ग्रीन योजनेत सहभागी होऊन दरमहा प्रतिबिल दहा रुपयांची बचत करावी. यासंदर्भात वसई मंडलात जनजागृती करून ग्राहकांचे प्रबोधन करण्यात येत आहे.

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर आणि वसई मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती मोहिम सुरू आहे. वसई मंडलात वसई आणि विरार या दोन विभागीय कार्यालयांचा समावेश होतो. दरमहा या मंडलातील 75 ते 80 टक्के ग्राहक विविध डिजिटल माध्यमांतून त्यांच्या वीजबिलांचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करतात. महावितरणचे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल प, विविध पेमेंट वॅलेट आदींच्या माध्यमातून डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग मार्फत वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. ऑनलाईन वीज भरणा करणाऱ्यांसाठी वीजबिलाच्या पाव टक्के सवलत आहे. उर्वरित ग्राहकांनीही सुरक्षित व सुलभ विविध पर्यायांचा वापर करून वीजबिल ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबत या मोहिमेत जनजागृती करण्यात येत आहे. तर गो-ग्रीन योजनेत सहभाग नोंदवून छापील वीजबिल नाकारणाऱ्या ग्राहकांना दरमहा प्रतिबिल दहा रुपयांची सवलत देण्यात येते. सद्यस्थितीत वसई मंडलातील सुमारे 12 हजार 200 ग्राहक या योजनेचा लाभ घेत आहेत. वसई-विरार महापालिका कार्यालय, विविध महाविद्यालये, गृहसंकुले, सोसायट्या आदी ठिकाणी ऑनलाईन वीजबिल भरणा व गो-ग्रीन योजनेबाबत माहिती सांगून ग्राहक प्रबोधन करण्यात येत आहे. मंडल, विभाग, उपविभाग कार्यालयातील अधिकारी, अभियंते, कर्मचारी या मोहिमेत सहभागी आहेत.

Exit mobile version