| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या एका पत्रात आरोग्यासंबंधी कारणे आणि उपचार घेण्याच्या सल्ल्याचा हवाला देत, संविधानाच्या कलम 67 (अ) अंतर्गत त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली आहे.
राष्ट्रपती मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात जगदीप धनखड म्हणाले आहेत की, आरोग्याला प्राधान्य आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करत मी भारताच्या उपराष्ट्रापती पदाचा संविधानाच्या 67 (अ) कलमानुसार तात्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे. राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात, धनखड यांनी पुढे त्यांच्या कार्यकाळात त्यांना मिळालेला पाठिंबा आणि सौहार्दपूर्ण संबंधांसाठी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आणि त्यांचा पाठिंबा अमूल्य असल्याचे म्हटले आहे. तसेच आपल्या कार्यकाळादरम्यान त्यांच्याकडून खूप काही शिकल्याचेही धनखड यावेळी म्हणाले. संसदेतील सर्व सदस्यांकडून जे प्रेम, विश्वास आणि सन्मान मिळाला तो माझ्या आठवणीत जन्मभर राहिल. मी या महान लोकशाहीसाठी आभारी आहे, मला या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मिळालेले अनुभव आणि ज्ञान हे इकृतज्ञता अत्यंत मौल्यवान होते. ही माझ्यासाठी सौभाग्य आणि समाधानाची गोष्ट आहे की मी भारताची अभूतपूर्व आर्थिक प्रगती आणि परिवर्तनकारी काळातील वेगाने होणारा विकास पाहिला आणि त्यामध्ये माझं योगदान दिलं. या महत्त्वपूर्ण काळात सेवा करणे माझासाठी खरी सन्मानाची बाब आहे. आज मी हे पद सोडत आहे तेव्हा माझ्या मनात भारताचे यश आणि उज्वल भविष्यासाठी अभिमान आणि अतूट विश्वास आहे, असे धनखड त्यांच्या पत्रात म्हणाले आहेत.
जगदीप धनखड यांचा राजकीय प्रवास
जगदीप धनखड हे भाजपमध्ये येण्यापूर्वी जनता दल आणि काँग्रेसचे सदस्य होते. 1989 ते 1991 पर्यंत लोकसभेत जनता दलाचे खासदार होते. ते राजस्थानच्या झुंझुनू लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. 1991 मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले. मात्र 1991 साली त्यांचा अजमेर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. त्यानंतर ते राजस्थानच्या किशनगड विधानसभा मतदारसंघातून आमदार बनले. 1998 मध्ये त्यांनी झुंझुनू लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र यातही त्यांचा पराभव झाला. 2003 मध्ये ते भाजपमध्ये सामील झाले. उपराष्ट्रपती होण्यापूर्वी धनखड हे 2019 ते 2022 पर्यंत पश्चिम बंगालचे राज्यपाल होते.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा
मार्च महिन्यात जगदीप धनखड यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. हृदयाशी संबंधीत इन्फेक्शन झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांची रुग्णालया जाऊन भेट घेतली होती. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होताच धनखड यांनी राजीनामा दिला आहे. आजच अधिवेशनाचा पहिला दिवस होता.






