‘जय भवानी,जय शिवाजी’चा तिथीनुसार पुन्हा एकदा जयघोष

। महाड । वार्ताहर ।
श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती , कोकण कडा मित्र मंडळ आणि रायगड जिल्हा परिषद यांच्यावतीने रविवारी किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता.जय भवानी,जय शिवाजीच्या जयघोषांनी अवघा दुर्गराज दणाणून गेला.


या सोहोळ्याला खा.डॉ. श्रीकांत शिंदे, खा.श्रीरंग बारणे, आ. भरत गोगावले, आ.महेंद्र थोरवे, माजी आ. मनोहर भोईर, विहिंपचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर, शिव प्रतिष्ठान युवा संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष नितीन चौगुले, बजरंग दलाचे संदीप भगत, इतिहास अभ्यासक पांडूरंग बलकावडे, शिवव्याख्याते सौरभ करडे, चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, युवा सेना जिल्हा अधिकारी विकास गोगावले, कोकणकडा मित्रमंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार, नितीन पावले, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडचे अध्यक्ष सुनिल पवार आदि मान्यवर उपस्थित होते.


ध्वजपूजन, ध्वजारोहण झाल्यानंतर मुख्य शिवराज्याभिषेक सोहोळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर उपस्थति असलेले दोन दाम्पत्य जोडीच्या तसेच सर्वच मान्यवरांच्या हस्ते श्री. छत्रपती शिवरांयांच्या मूर्तीवर दूग्धाभिषेक आणि जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर खा. डॉ. श्रीकांत शिंदे, खा. बारणे, आ. गोागवले, आ. थोरवे यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीवर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. या नंतर आपले मनोगत व्यक्त करताना खा. श्रीकांत शिंदे यांनी पुढील वर्षी 350 वा शिवराज्याभिषेक सोहोळा भव्य दिव्य स्वरुपात साजरा करण्यात येईल अशी घोषणा केली. आ. गोगावले यांनी आषाढी, कार्तिकीला जेवढे पूण्य पंढरपूरच्या पांडूरंगाच्या दर्शनाने मिळते तेवढेच पूण्य रायगडवर येवून मिळते असे यावेळेस सांगितले. राजसदर ते जगदिश्‍वर मंदिर अशी शिवप्रतिमेची पालखी मिरवणूक झाल्यानंतर या सोहोळ्याची सांगता झाली. सुमारे पन्नास हजार शिवभक्त यावेळेस गडावर उपस्थित होते. पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

Exit mobile version