। मुंबई । प्रतिनिधी ।
आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून अजित पवार स्वत: रिंगणात न उतरता आपला मुलगा जय पवार यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत त्यांच्याकडून देण्यात आले आहेत. मी सात-आठ वेळा आमदार म्हणून निवडून आलोय. आता मला रस नाही. जय पवार यांच्याबाबत जनता आणि पक्षाचे कार्यकर्ते निर्णय घेतील, असे वक्तव्य अजित पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजितदादा गटाकडून जय पवार हे रिंगणात उतरतील, अशी जोरदार चर्चा आहे. अशावेळी शरद पवार गटाकडून त्यांच्याविरुद्ध कोण रिंगणात उतरणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार गटाकडून गेल्या काही दिवसांपासून युगेंद्र पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीत जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढाई पाहायला मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.