। हैद्राबाद । वृत्तसंस्था ।
प्रो कबड्डी लीगमध्ये रविवारी (दि.27) जयपूर पिंक पँथर्स व तमीळ थलैवाज यांच्यात झालेल्या लढतीत 30-30 अशी बरोबरी झाली. तसेच, अन्य लढतीत यूपी योद्धास संघाने गुजरात जायंट्स संघावर 35-29 असा विजय साकारला आहे.
यावेळी जयपूर व तमीळ यांच्यामध्ये अटीतटीची लढाई रंगली होती. पूर्वार्धात जयपूर संघाकडे 21-16 अशी आघाडी होती. उत्तरार्धात मात्र तमीळ संघाने झोकात पुनरागमन केले. या सत्रात तमीळ संघाने 14 गुणांची, तर जयपूर संघाने फक्त नऊ गुणांची कमाई केली. जयपूरकडून अर्जुन देशवालने सात गुणांची, तर विकास कंडोलाने सहा गुणांची कमाई केली. तमीळ संघासाठी सचिन या चढाईपटूने उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने 11 गुणांची कमाई करीत संघाला बरोबरी साधून दिली.
दुसर्या सामन्यात यूपी योद्धास संघाच्या गुजरात जायंट्सवरील विजयात भारत चमकला. त्याने अष्टपैलू खेळ करीत 13 गुणांची कमाई करतानाच यूपीला दिमाखदार विजय मिळवून दिला. गुजरातकडून हिमांशू सिंग व राकेश यांनी प्रभावी खेळ केला. मात्र, त्यांना काही विजय साकारता आला नाही.