ममदापूर वाडीतील आदिवासींचा आरोप
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील ममदापूर या ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन मिशनमधून नळपाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. या ग्रामपंचायतीमधील ममदापूर वाडी या आदिवासी वस्ती असलेल्या आदिवासी ग्रामस्थांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा आणला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी उपोषणदेखील केले होते. मे महिन्यात त्या आदिवासी वाडीतपर्यंत नळपाणी योजनेचे पाणी पोहोचले आहे. परंतु, आता या जलवाहिनीमधून स्थानिक भागात असलेल्या खासगी फार्महाऊस मालकाला बंगल्याचे बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून नळजोडणी दिली जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. परंतु, ग्रामपंचायत प्रशासनाने हा आरोप फेटाळून लावला आहे.
ममदापूर वाडी ही आदिवासी लोकांची वस्ती माथेरान डोंगराच्या पायथ्याशी वसली आहे. शासनाच्या जलजीवन मिशनमधून याठिकाणी नळपाणी योजना राबविण्यात आली आहे. या योजनेचे पाणी ममदापूर गावात आणि नवीन नागरी वस्तीत जानेवारी मध्ये पोहोचले होते. मात्र, एप्रिल-मेसारख्या उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने स्थानिक आदिवासी ग्रामस्थांनी नळाचे पाणी मिळावे यासाठी अर्ज, निवेदने दिली. मात्र, ग्रामपंचायतीकडून कोणत्याही परिस्थितीत नळजोडणी ममदापूर वाडीपर्यंत नेली नव्हती. त्यानंतर जलवाहिनी टाकण्यात यावी यासाठी या आदिवासी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. त्यानंतर जलवाहिनी टाकण्यात आली, पण त्या जलवाहिनीला ममदापूर येथे मुख्य जलवाहिनी जोडण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे ममदापूर वाडीमध्ये नळाचे पाणी पोहोचत नव्हते. त्यामुळे आदिवासी ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरु केले. साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता सुजित धनगर यांनी नळपाणी योजनेची जलवाहिनी जोडून वाडीमध्ये पाणीपुरवठा सुरु केला.
मात्र, या ग्रामपंचायतीमधून अद्याप कोणतेही खासगी कनेक्शन देण्यात आले नाही. योजनेचे संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर ममदापूर ग्रामपंचायतीकडून घरोघरी नळजोडणी देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. नळपाणी योजनाईचे काम पूर्ण झाले नसताना आणि ममदापुर वाडीकडे जाणाऱ्या अडीच इंच व्यासाच्या जलवाहिनीमधून त्या भागातील एका फार्महाऊस मालकाला बांधकामसाठी पाणी देण्याचा घाट घातला आहे. त्या फार्म हाऊस मालकाने अडीच इंचाची जलवाहिनी टाकून पाणी आपल्या फार्म हाऊसमध्ये नेले असल्याचा आरोप करणारे निवेदन ममदापूर ग्रामपंचायतीला दिले आहे.
या निवेदनावर कमळी निरगुडा, हिरु निरगुडा, गणेश निरगुडा, योगेश निरगुडा, प्रवीण निरगुडा, दीपक निरगुडा, कुंदा निरगुडा, सुरेखा निरगुडा, गुलाब निरगुडा, विजय पारधी, दशरथ निरगुडा, योगेश अनंत निरगुडा, प्रमिला निरगुडा यांच्या सह्या आहेत. हे निवेदन 21 डिसेंबर रोजी ममदापुर ग्रामपंचायतीकडे देण्यात आले आहे. या अनधिकृत नळजोडणीबाबत ममदापूर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सूरज मुकादम यांना विचारले असता आपण खासगी नळजोडण्या कोणालाही दिलेल्या नाहीत. मात्र, अशी नळजोडणी मुख्य जलवाहिनीवरून जोडण्यात आली असेल तर तात्काळ कारवाई केली जाईल, असे सांगितले.







